जेएनएन, छत्रपती संभाजीनगर: दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना बाजारपेठेत खाद्यपदार्थांच्या किमती वाढण्याबरोबरच भेसळखोरीचे प्रकारही समोर येत आहेत. सणासुदीच्या काळात मिठाई, खाद्यतेल, दूध, खवा आणि मसाल्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. याच संधीचा फायदा घेत काही व्यावसायिकांकडून खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेशी तडजोड केली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनाने तपासणी मोहीम तीव्र केली आहे.
राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडून विविध ठिकाणी तपासणी आणि कारवाई केली जात आहे. यापूर्वी नियमित खाद्यपदार्थांच्या तपासणीवर भर देणाऱ्या प्रशासनाने आता मसाला उत्पादक आणि विक्रेत्यांकडेही विशेष लक्ष केंद्रित केले आहे. याच मोहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगरमध्ये एका मसाला उत्पादक कंपनीवर छापा टाकून मोठ्या प्रमाणात मसाल्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
गाढे जळगावमधील ‘5 स्टार मसाले’ कंपनी लक्ष्यावर
छत्रपती संभाजीनगर शहरालगतच्या गाढे जळगाव परिसरातील मेसर्स 5 स्टार मसाले या कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकला. या तपासणीत मोठ्या प्रमाणात मसाल्यांचा साठा आढळून आला. प्रशासनाने एकूण 2 हजार 802 किलो मसाल्यांचा साठा जप्त केला आहे. यामध्ये हळद पावडर, मिरची पावडर, धणे पावडर आणि मटण मसाल्याचा समावेश आहे.
दैनंदिन स्वयंपाकापासून ते सणासुदीच्या विशेष पदार्थांपर्यंत मसाल्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे मसाल्यांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी FDA कडून उत्पादक कंपन्या, घाऊक विक्रेते आणि गोदामांची तपासणी केली जात आहे. विशेष म्हणजे, मसाल्यांमध्ये रंग, निकृष्ट दर्जाचा कच्चा माल,इतर पदार्थांची भेसळ केली जात असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही तपासणी महत्त्वाची मानली जात आहे.
राज्यभरात 19.70 कोटींचे मसाले जप्त
दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरात मसाले आणि मसालेजन्य पदार्थांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. 1 एप्रिल ते 29 ऑक्टोबर 2026 या कालावधीत राज्यातील 1 हजार 57 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या कारवाईत तब्बल 19 कोटी 70 लाख रुपये किमतीचा 11 हजार 963 क्विंटल मसाल्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच 84 आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, 557 सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे, 23 ते 29 ऑक्टोबर या अवघ्या सात दिवसांत 472 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या काळात 783 नमुने घेण्यात आले आणि सुमारे 13 कोटी 60 लाख रुपये किमतीचा मसाल्यांचा साठा जप्त करण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक कारवाई
मसाल्यांमधील भेसळ रोखण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेत छत्रपती संभाजीनगर विभागानेही मोठी कारवाई केली आहे. 1 एप्रिल ते 29 ऑक्टोबरदरम्यान विभागातील 96 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत 6 कोटी 42 लाख 77 हजार रुपये किमतीचा 2 हजार 517.27 क्विंटल मसाल्यांचा साठा जप्त करण्यात आला. तसेच 27 आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, 47 सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
