जेएनएन, बीड: फलटण येथे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील वडवणी शहरात आज बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला सर्व पक्ष, संघटना आणि व्यापारी वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. शहरातील सर्व व्यवहार, दुकाने आणि बाजारपेठा आज पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत.

मृत डॉक्टर या वडवणी तालुक्यातील मूळ रहिवासी असल्याने त्यांच्या मृत्यूने संपूर्ण परिसरात संताप आणि दु:खाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांकडून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी होत आहे.

कुटुंबीयांचा आरोप

माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी फलटण येथे एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या घटनेमागे कामाच्या ठिकाणी झालेला त्रास आणि मानसिक छळ कारणीभूत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणात काही संशयितांची चौकशी सुरू असली तरी अद्याप कोणावरही ठोस कारवाई झाली नसल्याने नागरिकांचा रोष वाढला आहे.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात

आजच्या बंददरम्यान परिस्थिती शांततामय ठेवण्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. शहरातील मुख्य चौक, बसस्थानक परिसर आणि व्यापारी पेठेत पोलीस बंदोबस्त केला आहे. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले आहे. 

    वडवणीतील अनेक सामाजिक संघटना, व्यापारी संघ आणि स्थानिक राजकीय नेत्यांनी या बंदला पाठिंबा दर्शविला आहे. महिला संघटनांकडून आज आणि उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवणार” अशी घोषणा करण्यात आली आहे.