जेएनएन, मुंबई. कोकणपुत्र ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचं निधन झाले आहे. वस्त्रहरण, दोघी, वनरुम किचन या सारख्या नाटकांमधून संपूर्ण महाराष्ट्राचं मनोरंजन करणारे गंगाराम गवाणकर यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळामुळे आलेल्या आजाराशी त्यांची झुंज अपयशी ठरली. दहिसर इथल्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज सकाळी 9.30 वाजता बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात ठेवण्यात आले आहे. त्यानंतर दहिसर येथील अंबावाडी, दौलतनगर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात मुले आणि नातवंडे असा परिवार आहे.

गंगाराम गवाणकर यांनी लिहिलेली नाटके

‘वरपरीक्षा’, ‘दोघी’, ‘वर भेटू नका’, ‘वेडी माणसे’ यांसारखी नाटके त्यांनी लिहिली आहेत. ‘दोघी’ हे नाटक त्यांनी काळाच्या पुढचा विचार करून लिहिलं होतं. तर विनोदी शैलीत फटकारणारं नाट्यलेखन ही त्यांची खासियत होती. ‘वन रुम किचन’ हेसुद्धा त्यांच्या नेहमीच्या शैलीपेक्षा वेगळं नाटक होतं. परंतु ‘वस्त्रहरण’ ही त्यांची अखेरपर्यंतची ओळख ठरली. हे नाटक लिहिण्याचा अनुभव, त्या निमित्ताने आलेल्या आठवणी आणि आपल्या आयुष्याची वाटचाल या सर्वांची मांडणी त्यांनी ‘व्हाया वस्त्रहरण’ या पुस्तकात केली.  

मालवणी बोलीभाषेचा एक प्रतिभावान साहित्यिक काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या निधनामुळे मालवणी बोलीभाषेचा एक प्रतिभावान साहित्यिक काळाच्या पडद्याआड गेला. 'वस्त्रहरण' सारख्या अजरामर कृतीतून त्यांनी व्यंग आणि वास्तवता प्रभावीपणे मांडली आणि मालवणी बोलीला सातासमुद्रापार पोहोचवलं, अशा शब्दांत खासदार वर्षा गायकवाड यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

    मालवणी बोलीभाषेचा सिद्धहस्त साहित्यिक काळाच्या पडद्याआड

    'वस्त्रहरण' या नाटकाचे लेखक, मालवणी बोलीला सातासमुद्रापार घेऊन जाणारे नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. त्यांनी आपल्या लेखणीतून व्यंगातून वास्तविकता कलात्मक व प्रभावी पद्धतीने मांडली. त्यांच्या निधनामुळे मालवणी बोलीभाषेचा सिद्धहस्त साहित्यिक काळाच्या पडद्याआड गेला, खासदार सुप्रिया सुळे यांनी अशा शब्दांत गंगाराम गवाणकर यांना आदरांजली अर्पण केली आहे.

    हेही वाचा - Jay Bhanushali आणि माही विज घेणार घटस्फोट? लग्नाच्या 14 वर्षांनंतर, या जोडप्याने घेतला मोठा निर्णय