जेएनएन,सोलापूर: सावकाराकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी कर्जबाजारी शेतकऱ्यांची किडनी विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश झाला असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला सोलापुरात अटक करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील रेशन सदाशिव कुडे या तरुण शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर हे गंभीर प्रकरण उघडकीस आले असून तपास महाराष्ट्र ह्युमन राइट्स विभागाकडे सोपवण्यात आला आहे.
या प्रकरणात कृष्णा मल्लेशमला या आरोपीला अटक करण्यात आला आहे.मल्लेशम आंतरराष्ट्रीय किडनी रॅकेटशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, रेशन कुडेप्रमाणेच अन्य काही नागरिकही या रॅकेटच्या जाळ्यात अडकले असल्याची शक्यता तपासात व्यक्त केली जात आहे.
कर्जाच्या ओझ्यातून किडनी विक्रीपर्यंतचा प्रवास
रेशन कुडे यांनी सावकाराकडून घेतलेल्या 9 लाख रुपयांच्या कर्जावर चक्रवाढ व्याज लावण्यात आले. काही कालावधीतच हे कर्ज तब्बल 74 लाखांपर्यंत पोहोचले. कर्ज फेडण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करूनही यश न आल्याने सावकाराच्या दबावाखाली अखेर रेशन कुडे यांनी किडनी विकण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.
याच दरम्यान, आंध्रप्रदेशातील कृष्णा मल्लेशम याने ऑनलाईन माध्यमातून रेशन कुडे यांच्याशी संपर्क साधला. स्वतः इंजिनिअर असल्याचे भासवणाऱ्या कृष्णाने डॉक्टर असल्याची बतावणी करत विश्वास संपादन केला. त्यानंतर रेशन कुडे यांना कंबोडियाला नेऊन किडनी प्रत्यारोपण करण्याची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली.
कंबोडियात बेकायदेशीर प्रत्यारोपण
रेशन कुडे यांना कंबोडियात नेऊन मेडिकल रिपोर्ट्स काढण्यात आले आणि बेकायदेशीर पद्धतीने किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कंबोडियातील एका डॉक्टरशी संपर्कात राहून कृष्णा मल्लेशम हा रॅकेट चालवत असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.
2018 मध्ये स्वतः व्यवसायात मोठे नुकसान झाल्यानंतर कृष्णा मल्लेशम याने स्वतःची एक किडनी विकली होती. त्या अनुभवातूनच त्याने किडनी विक्रीचे हे अवैध रॅकेट उभारल्याचे तपास यंत्रणांना आढळून आले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कर्जबाजारी आणि असहाय्य व्यक्तींना लक्ष्य करून हा रॅकेट चालवला जात होता.
सोलापुरात अटक, तपासाला वेग
या प्रकरणाची गंभीर दखल घेत सोलापुरात कृष्णा मल्लेशम याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून मोबाईल, डिजिटल पुरावे आणि आंतरराष्ट्रीय संपर्कांची माहिती जप्त करण्यात आली असून आणखी किती लोक या रॅकेटचे बळी ठरले आहेत, याचा सखोल तपास सुरू आहे.
मानवाधिकारांचे गंभीर उल्लंघन
फसवणूक आणि अवयव तस्करीसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या डॉक्टर, एजंट आणि आर्थिक साखळीचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.
हेही वाचा: ‘सिल्वर ओक’वर पवार काका–पुतण्याची भेट; राष्ट्रवादीतील विलिनीकरणाची शक्यता वाढली
