मुंबई. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा पेच आणखी वाढताना दिसत आहे. काल पार पडलेल्या महायुतीच्या दुसऱ्या बैठकीनंतर 150 जागांवर एकमत झाल्याचा दावा नेत्यांकडून करण्यात आला असला, तरी उर्वरित 77 जागांवर अद्याप निर्णय प्रलंबित आहे. दरम्यान मुंबईतील तब्बल 84 जागा शिवसेनेला (शिंदे  गट) सोडण्यास भाजपने स्पष्ट नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. या जागा 2017 च्या निवडणुकीत शिवसेनेने जिंकल्या होत्या.

भाजपच्या भूमिकेमुळे महायुतीतील अंतर्गत तणाव उघडपणे समोर येत असून, शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये थेट लढत होण्याची शक्यता अधिक बळावली आहे. 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेने जिंकलेल्या 84 जागांवर एकनाथ शिंदे गटाने जोरदार दावा केला आहे. मात्र, या जागांवर शिंदे गटाला मोकळं रान देणं महायुतीसाठी तोट्याचं ठरेल, असा भाजपचा अंदाज आहे. 

भाजपची त्या जागा शिवसेनेला का नाकारल्या?

माहितीनुसार, या 84 जागांवर शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशी थेट लढत झाल्यास महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप या जागा सोडण्यास तयार नाही. भाजपने स्पष्ट केलं आहे की, ज्या प्रभागांमध्ये शिंदे गटाचं प्राबल्य आहे त्या जागा सोडण्यास  सहमती आहे, मात्र 2017 च्या निकालाच्या आधारे सरसकट जागावाटप मान्य नाही.

150 प्लस जागांवर भाजप ठाम-

महायुतीत भाजपने मुंबईत 150 पेक्षा अधिक जागांवर दावा कायम ठेवला आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडूनही अधिक जागांसाठी जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे. त्यामुळे महायुतीतील जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला ठरवणं अधिक कठीण बनलं आहे.

    महायुतीच्या नेत्यांनी उर्वरित 77 जागांवर लवकरच निर्णय होईल, असा दावा केला असला तरी सध्याची परिस्थिती पाहता मुंबईत मैत्रीपूर्ण लढत होईल की थेट संघर्ष, याबाबत अनिश्चितता कायम आहे. विशेषतः 84 जागांवर शिंदे विरुद्ध ठाकरे सामना झाल्यास मुंबईची राजकीय समीकरणं पूर्णतः बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.