मुंबई l BMC Election 2026 : आगामी BMC निवडणुकीत महायुतीतील प्रमुख पक्षांमध्ये तब्बल 150 जागांवर प्राथमिक सहमती झाल्याची माहिती समोर आली आहे. उर्वरित जागांबाबत अद्याप ही एकमत न झाल्याने त्या जागांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मिळून अंतिम निर्णय घेणार आहेत.
मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी होणारी ही निवडणूक राज्याच्या राजकारणात अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्यामुळे महायुतीमध्ये जागावाटपावरून सुरुवातीपासूनच सखोल चर्चा सुरू होत्या. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात अनेक फेऱ्यांच्या बैठका झाल्यानंतर 150 जागांवर एकमत साधण्यात यश आले आहे.
माहितीनुसार, भाजपने तुलनेने अधिक जागांची मागणी केली असून शिवसेना शिंदे गटाने मुंबईतील आपली पारंपरिक ताकद लक्षात घेऊन काही महत्त्वाच्या विभागांवर दावा केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानेही काही निवडक आणि प्रभावी प्रभागांवर लक्ष केंद्रीत केले आहे. या पार्श्वभूमीवर उर्वरित जागांवर तिढा कायम असून तो सोडवण्याची जबाबदारी थेट महायुतीच्या सर्वोच्च नेतृत्वावर सोपवण्यात आली आहे.
याबाबत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात स्वतंत्र बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत उर्वरित जागांचे वाटप, मैत्रीपूर्ण लढती टाळण्याची रणनीती आणि प्रचाराची संयुक्त रूपरेषा ठरवली जाणार असल्याचे बोलले जात आहे. अंतिम निर्णय झाल्यानंतर महायुतीकडून अधिकृत जागावाटप जाहीर केले जाईल.
दरम्यान, महायुतीच्या या हालचालींकडे विरोधकांचेही लक्ष लागले आहे. मुंबईत सत्ता कायम मिळवण्यासाठी महायुती एकत्रित ताकदीने मैदानात उतरणार आहे.
