जेएनएन, मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील सर्वात मोठा राजकीय पेच अखेर सुटला आहे. मुंबईतील सर्व 227 जागांवर शिवसेना आणि भाजपमध्ये एकमत झाले आहे.गेले अनेक दिवस सुरू असलेल्या जागावाटपाच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. रात्री उशिरापर्यंत पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीत महायुतीतील जागावाटपाचा तिढा सोडवण्यात यश आले आहे.
मुंबईतील जागावाटपासाठी गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या सतत बैठका सुरू होते. दोन्ही पक्षांकडून वेगवेगळे प्रस्ताव मांडण्यात येत होते. शिवसेनेने आपली पारंपरिक ताकद आणि स्थानिक संघटनांचा आधार देत अधिक जागांची मागणी केली होती, तर भाजपकडून मागील निवडणुकांतील कामगिरी आणि वाढलेला पक्षविस्तार पुढे करत आपली भूमिका ठामपणे मांडण्यात येत होती. मात्र, या प्रस्तावांवर दोन्ही पक्षांमध्ये एकमत होत नव्हते.
अखेर रात्री झालेल्या निर्णायक बैठकीत महायुतीतील नेत्यांनी समन्वय साधत सर्व २२७ जागांवर तत्त्वतः सहमती दर्शवली. त्यामुळे मुंबईतील महायुतीच्या निवडणूक रणनीतीला मोठा दिलासा मिळाला आहे. तथापि, भाजप आणि शिवसेनेच्या वाट्याला नेमक्या किती जागा येणार, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
माहितीनुसार, या बैठकीचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला जाणार आहे.अंतिम मंजुरीनंतरच जागावाटपाचा अधिकृत फॉर्म्युला जाहीर केला जाणार आहे.
दरम्यान, जागावाटपाचा तिढा सुटल्याने निवडणूक प्रक्रियेला वेग येणार असून, उद्यापासून दोन्ही पक्षांकडून उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर सोमवार पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.त्यामुळे मुंबईतील महायुतीची निवडणूक तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
महायुतीने एकत्र येत जागावाटपाचा प्रश्न मार्गी लावल्याने, मुंबई महापालिका निवडणुकीत विरोधकांसमोर मजबूत आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. आगामी काही तासांत जागावाटपाचा अधिकृत आकडा जाहीर होताच मुंबईतील राजकीय चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा: काका-पुतण्याच्या गणित पुन्हा बिघडलं; पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींची चर्चा फिस्कटली? चिन्हावरून तिढा कायम
