जेएनएन, मुंबई. ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त अखेर ठरल्याची माहिती समोर आली आहे. 18 डिसेंबर रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महराष्ट्र नवनिर्माण सेना युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
संजय राऊत–राज ठाकरे भेटीला महत्त्व!
संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्यात झालेली ही भेट अत्यंत महत्त्वाची समजली जाते. या भेटीत आगामी महापालिका निवडणुका, विशेषतः मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणूक, युतीची रूपरेषा, जागावाटप आणि संयुक्त प्रचाराची रणनीती यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. ही भेट केवळ औपचारिक नसून युतीच्या अंतिम घोषणेपूर्वीचा निर्णायक टप्पा मानला जात आहे.
18 डिसेंबरला काय घडणार?
माहितीनुसार,18 डिसेंबर रोजी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा होऊ शकते. ठाकरे बंधू एकत्र मंचावर येऊन युतीची घोषणा करू शकते.
मराठी अस्मितेचा मुद्दा केंद्रस्थानी-
ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीमध्ये मराठी अस्मिता, मुंबईवरील हक्क, स्थानिक तरुणांचा रोजगार, मराठी भाषा आणि संस्कृतीचे जतन हे मुद्दे केंद्रस्थानी असणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यामुळे मराठी मतदारांमध्ये मोठे राजकीय ध्रुवीकरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीवर परिणाम-
ठाकरे बंधू एकत्र आल्यास, महायुतीसाठी मोठे आव्हान निर्माण होणार आहे. मुंबई आणि शहरी भागातील समीकरणे बदलणार आहे. विरोधी मतांचे विभाजन थांबून थेट लढत अधिक तीव्र होणार आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) या शहरांमध्ये युतीचा मोठा प्रभाव दिसू शकतो. दुसरीकडे महाविकास आघाडीतील करबुरीही समोर येण्याची आहे.
