मुंबई. municipal corporation election 2026 : मुंबई, पुणे, ठाणे आणि नवी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोठी राजकीय हालचाल करत उमेदवारी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शिवसेनेसोबत जागावाटपाबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसतानाच, भाजपने स्वबळावर तयारी सुरू केल्याने युतीतील तणाव पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे.
भाजप कोअर कमिटीच्या अलीकडील बैठकीत सुमारे 100 ते 110 जागांवर उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दुपारपासून रात्री उशिरापर्यंत सलग बैठका घेतले. या बैठकीत मुंबईसह प्रमुख महापालिकांतील काही महत्वाच्या प्रभागांमधील उमेदवार निश्चित करण्यात आल्याचं समजते.
जागावाटप ठरलेलं नसतानाही भाजप आक्रमक-
शिवसेना-भाजप युतीत महापालिका जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेकडून 100 जागांची मागणी, तर भाजपकडून 70 जागांचा प्रस्ताव अशा पार्श्वभूमीवर चर्चा सुरू असताना भाजपकडून उमेदवार निश्चित करण्याचा निर्णय दबाव तंत्राचा भाग असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.
भाजपने उमेदवारी निश्चित केल्याने, युती झाली नाही तरी स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी पक्ष पूर्णतः सज्ज असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
कोअर कमिटी बैठकीत काय ठरलं?
माहितीनुसार,
• विद्यमान नगरसेवकांना प्राधान्य
• संघटनात्मक कामगिरी आणि स्थानिक जनाधार
• जातीय आणि सामाजिक समीकरणं
• संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी आधीच उमेदवारी निश्चित
या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करूनच उमेदवारांची नावे अंतिम करण्यात आली आहेत.
शिंदेंच्या शिवसेनेसोबत चर्चा सुरूच!
दुसरीकडे, भाजप आणि शिवसेनेदरम्यान जागावाटपाबाबत चर्चा अद्याप सुरूच असल्याचं स्पष्ट करण्यात येत आहे. वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर बैठका होत असून, अंतिम निर्णय जाहीर व्हायचा बाकी आहे. मात्र, भाजपच्या या हालचालींमुळे शिवसेनेवर दबाव वाढल्याचं चित्र आहे.
