जेएनएन, जालना: राज्यात नाफेडच्या माध्यमांतून सोयाबीनची खरेदी सुरू केली आहे. नाफेडकडून खरेदीसाठी नियुक्त केलेले खासगी खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. सोयाबीनला गाळणी आणि हमालीच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून 140 रुपये प्रती क्विंटलने वसूली केली जात आहे, असा आरोप आहे.

काय आहे प्रकरण

जालना जिल्हातील जय जिवाजी फार्मर प्रोड्यूसर कंपनी ढोकसाळ सेंटर तालुका मंठा यांच्या संचालिका सीमा दत्तात्रय अवचर द्वारा संचालित नाफेड खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडून गाळणी आणि हमालीच्या नावाखाली 140 रुपये प्रती क्विंटलची वसूली केली जात आहे. असा आरोप करत वसुलीची तक्रार शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. 

अनेक शेतकऱ्यांकडून पावती न देता घेतले पैसे

नाफेड खरेदी केंद्राची 140 रुपयाची वसूली तत्काळ थांबवावी अशी मागणी त्यांनी केली आहे. सोयाबीन खरेदी दरम्यान जय जिवाजी फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे सहायक दिगंबर अवचर यांनी अनेक शेतकऱ्यांकडून पावती न देता फोन पे नंबरवर पैसे घेतले असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. संचालिका सीमा दत्तात्रय अवचर यांच्याशी फोनवर संपर्क साधले असतांना सहायक दिगंबर अवचर यांनीच संवाद साधला आहे. संचालिका सीमा दत्तात्रय अवचर यांच्याशी संवाद होऊ शकला नाही.

    कडक कारवाई केली जाईल

    या प्रकरणाची माहिती राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांना दिली असता संबंधित संस्थाला ब्लॅकलिस्ट करून कडक कारवाई केली जाईल अशी माहिती दिली. नाफेड खरेदी केंद्रावर सोयाबीन खरेदी करत असतांना कुठलेही पैसे आकरले जात नाही. सोयाबीन खरेदी करत असतांना शेतकरी कडून वसूली केल्यास त्या संस्थांवर तत्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत.

     काय म्हणाले पणनमंत्री…

    राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी मराठी जागरणला सोयाबीन खरेदीमध्ये शेतकरीकडून कुठेलही पैसे नाफेडकडून आकरले जात नाही. जर कोणी नाफेड खरेदी केंद्रावर असे पैसे आकारले जात असतील तर त्या संस्थेचा परवाना रद्द करून ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात येईल. जय जिवाजी फार्मर प्रोड्यूसर कंपनीची चौकशी करून कारवाई केली जाईल, असं ते म्हणाले.

    काय म्हणाले दिगंबर अवचर

    जय जिवाजी फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे सहायक दिगंबर अवचर यांच्याशी मराठी जागरण यांनी फोनवर संपर्क केला. अवचर यांना शेतकऱ्यांकडून 140 रुपये वसूल केले जात आहे अशी तक्रार असल्याचे विचारले असता, त्यांनी यावर उडवाउडवीची उत्तरे दिली. व मुळ प्रश्नाला उत्तर दिले नाही.

    जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईकडे लक्ष

    केंद्र आणि राज्य सरकार शेतकरी हितोषी आहेत की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. या कंपनी मागे राजकीय वरदहस्त आहे, असा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत असून  कंपनीकडून होत असलेली शेतकऱ्यांची लूट कधी थांबणार आणि जिल्हाधिकारी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर, शेतकऱ्यांनी कंपनीकडून आपले पैसे परत करण्याची मागणी केली आहे.