नाशिक Nashik Crime News: नाशिकचा लिंगपिसाट भोंदूबाबा अशोक खरात याच्याबद्दल धक्कादायक खुलासे बाहेर येत आहेत. मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी विधानसभेतही खरातबाबत खळबळजनक खुलासे केले. आतापर्यंत त्याच्याविरोधात सात गुन्हे दाखल झाले असून अनेक महिलांवर लैगिंक अत्याचार करतानाचे त्याचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. अनेक सनदी अधिकारीही त्याच्या कारनाम्यामुळे गोत्यात आले आहेत. खरातने लहान मुली, घटस्फोटित, महिला इतकेच काय गर्भवती महिलांनाही सोडले नसल्याने त्याचाविरोधात समाजमन आक्रोशित झाले आहे. त्यातच पोलिसांच्या हाती लैंगिक अत्याचार करतानाचे 100 पेक्षा जास्त व्हिडिओ लागले आहेत. आता त्याच्या पूर्वआयुष्याशी निगडीत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

अंकशास्त्र तज्ज्ञ गणितातच फेल -

स्वत:ला अंकशास्त्रज्ञ व ज्योतिष व कॅप्टन म्हणून घेणारा अशोक खरात दहावीत दोन विषयात नापास झाला असून विशेष म्हणजे तो गणितातच फेल झाला होता. खरात त्याच्याकडे भविष्य जाणून घेण्यासाठी येणाऱ्यांची जन्मतारीख विचारून त्यांना अंकशास्त्राचा अभ्यास असल्याचे सांगून त्यांचा जन्मवार व भविष्य सांगत होता. त्या खरातचे कारनामे उघड होत आहेत. त्याची दहावीची गुणपत्रिका समोर आली असून त्याला दहावीत केवळ 35.88% टक्के गुण मिळाले आहेत. त्यात  गणितात केवळ 28 गुण मिळाले होते. 

'लक्ष्मण'  नाव काढून झाला 'अशोककुमार' -

अशोक खरात याचे मूळ गाव सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी (शिवाजीनगर) आहे. त्याच्या गावात माध्यमिक शिक्षणाची सोय नसल्याने तो त्याच्या गावापासून चार किलोमीटरवर असलेल्या वावी गावातील शाळेत जात होता. त्याच्या शैक्षणिक प्रमाणपत्रावर त्याची जन्मतारीख 1 जून 1965 असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर शाळेत त्याचे नाव 'लक्ष्मण एकनाथ खरात' असे होते. या लक्ष्मण नावाने त्याने मार्च 1983 मध्ये दहावीच्या बोर्डाची परीक्षा दिली होती. त्यानंतर त्याने लक्ष्मण नाव काढून अशोक केले. 1995 मध्ये त्याने शाळेतून दाखला काढला. त्यानंतर गॅझेटद्वारे आपले नाव 'अशोक' केले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

कॅप्टन नव्हे तर जहाजावर करायचा मजुरी - 

    अशोक खरात नौदलात 20 वर्ष सेवा बजावून कॅप्टन पदावरून निवृत्त झाल्याचे सांगतो. परिसरात त्याला कॅप्टन नावानेच संबोधले जाते मात्र जहाजावर तो कोणत्याही मोठ्य हुद्द्यावर नव्हता तर मजूर म्हणून कामाला होता, अशी माहिती समोर आली आहे. अशोक खरात अल्पवयीन असतानाच त्याने कोणतेतरी कांड केले. त्यानंतर पालकांनी त्याला चांगला चोप देऊन घराबाहेर काढले. घरच्यांनी घराबाहेर काढल्याने तो मालवाहू जहाजांवर मजूर, खानसामा म्हणून नोकरी करू लागला. या प्रवासात त्याची ओळख आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांशी झाली. त्यामुळे खरात महिलांच्या तस्करीत सहभागी असल्याचा संशय पोलिसांना आहे.

    झटपट श्रीमंत होण्यासाठी ज्योतिषविद्येचे शिक्षण -

    कष्ट व मजुरी करत असताना झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग म्हणून खरातने ज्योतिषविद्येचे शिक्षण घेतले. छोटे मोठे उद्योजक, समाजातील प्रतिष्ठित नागरिक, नगरसेवक अशा लोकांच्या संपर्कात येऊन तो त्यांचे भविष्य सांगू लागला. गेल्या काही वर्षांपासून अडल्या नडलेल्यांचे भविष्य पाहून त्यांच्याकडून पैसे उकळू लागला. 2022 साली राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिन्नरच्या मिरगावात जाऊन मंदिरात पूजाविधी केल्यानंतर अशोख खरात याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात परिचित झाले. त्याने नाशिक, पाथर्डी, सिन्नर, शिर्डी आदी भागांत कोट्यवधी रूपयांच्या जमिनी घेत 200 कोटींचे साम्राज्य उभे केले.