मुंबई. Ashok Kharat: भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात अत्यंत गंभीर आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबत खुलासा केला आहे. अंधश्रद्धेचा फायदा घेत महिलांवर अत्याचार केल्याचे आरोप अधिक स्पष्ट झाले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा व्हावा या बहाण्याने अशोक खरात याने संबंधित महिलेला पेढा खायला दिला. त्यानंतर तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. या प्रकारामुळे राज्यभर संताप व्यक्त होत आहे.
इतकेच नव्हे, तर पीडित महिलेला दिवस गेल्यानंतर तिला गर्भपातासाठी गोळ्या देण्यात आल्याचा धक्कादायक आरोपही समोर आला आहे. तसेच, ही बाब कुणाला सांगितल्यास “तुझं वाईट होईल” अशी धमकी देण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपी अशोक खरात सध्या पोलीस कोठडीत आहे. तपासादरम्यान आणखी पीडित महिला पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आरोपीच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी विविध स्तरातून होत आहे.
दरम्यान, विधानसभेत हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरत कठोर पावले उचलण्याची मागणी केली. अंधश्रद्धेविरोधात अधिक कडक कायदे आणि जनजागृतीची गरजही यावेळी अधोरेखित करण्यात आली.
या प्रकरणामुळे समाजात खळबळ उडाली असून, महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुढील तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
