नाशिक. स्वंयघोषित अंकशास्त्र व ज्योतिषी अशोक खरात (Ashok Kharat)चे दररोज निरनिराळे कारनामे समोर येत आहेत. दहावीत गणितात फेल झालेला अशोक पुढे जाऊन अंकशास्त्रज्ञ म्हणवून घेऊ लागला आणि लोकांच्या जन्मतारखेवरून त्यांचे भविष्य सांगू लागला. बालपणापासूनच त्यांच्या अंगात गुन्हेगारी प्रवृत्ती दिसून येत होती. बालपणी काहीतरी कांड केल्यावर त्याला घरच्यांनी चोप दिेऊन घराबाहेर काढले होते, त्यानंतर तो जहाजावर मजुरी करू लागला व झटपट पैसे कमवण्यासाठी ज्योतिष विद्या शिकला. शाळेत त्याच्या कृत्यामुळे त्याला कोंबडीचोर म्हणू लागले.
भोंदू अशोक खरात स्वत:ला कॅप्टन म्हणत असला तरी तो कोणत्याही मोठ्या हुद्यावर नव्हता तर मर्चंट नेव्हीत हमाली करत होता. हे काम करत असतानात त्याचे काही गुन्हेगारांशी संबंध आले. तो महिला तस्करीच्या गुन्ह्यात सामील होता का, याची चौकशीही पोलिस करत आहेत. आत्ता त्याच्या वर्गमित्रांनी दावा केला आहे की, खरातच्या या उद्योगांमुळे आमची शाळा बदनाम होत आहे. त्याचबरोबर परिसरात त्याला कोंबडीचोर व भामटा म्हणत होते, त्याला मोठ मोठे नेते, व्यापारी व उद्योजक कसे भुलले याचे आश्चर्यही व्यक्त केले जात आहे.
हे ही वाचा -Ashok Kharat: अंधश्रद्धेच्या आडून लैंगिक शोषण; आता अशोक खरात प्रकरणाला भयंकर वळण, नरबळीच्या संशयाने धडकी
अशोक खरातचे आता हायप्रोफाईल अनुयायी असले तरी शालेय जीवनात तो अभ्यासात फारच कच्चा होता. तो दहावीत दोन विषयात नापास झाला होता. अंकशास्त्रज्ञ म्हणून घेणारा खरातला गणितात केवळ 28 गुण मिळाले होते तर २५ भाषा येत असल्यादा दावा करणारा हा भोंदू भाषा विषयातही जेमतेमच होता. खरातला लहानपणी 'कोंबडी चोर' किंवा 'मोटर चोर' म्हणून चिढवले जायचे. घरातील अंडी चोरून तो शाळेत विकत असे. घरच्यांनी हाकलून लावल्यावर तो मर्चंट नेव्हीमध्ये मजूर म्हणून काम करून उदरनिर्वाह करू लागला, तेथून परतल्यावर त्याने 'कॅप्टन' म्हणवून घेण्यास सुरुवात केली आणि लोकांना फसवले.
भोंदू अशोक खरात प्रकरणी सर्व गुन्हे विशेष तपास पथकाकडे वर्ग करण्यात आले आहेत. यापुढील तपास एसआयटीच्या माध्यमातून होणार आहे. त्याच्याविरोधात नाशिक पोलिसांकडे दाखल झालेले 8 गुन्हे, तर वावी आणि सिन्नर पोलिसांकडील प्रत्येकी एक अशा 10 गुन्हांचा तपास एसआयटी करणार आहे. त्याने एका पुण्यातील व्यावसायिकालाही कोट्यवधी रुपयांना गंडवले असल्याचे समोर आले आहे. त्याने व्यावसायिकाला मृत्यूची भीती घालून त्याच्याकडून मर्सिडीज ब्रेंझ ही अलिशान गाडी घेतली, त्याला घेऊन 21 देशात फिरला तसेच आपल्या कार्यालयाचे फर्निचरही करून घेतले.
