नाशिक. नाशिकमध्ये भोंदूबाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतलं आहे.अंधश्रद्धा, लैंगिक शोषण आणि नरबळीच्या संशयामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

प्रकरणाला भीषण वळण-

अनेक महिलांना अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकवून त्यांचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या अशोक खरात याला नाशिक सत्र न्यायालयाने 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सुरुवातीला लैंगिक शोषणापुरतं मर्यादित वाटणाऱ्या या प्रकरणाने आता अधिक गंभीर आणि भयावह रूप धारण केलं आहे.

नरबळीचा संशय-

सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी अत्यंत धक्कादायक दावा केला. खरातने नरबळी दिल्याचा संशय असल्याचं न्यायालयात सांगण्यात आलं. या युक्तिवादामुळे न्यायालयीन प्रक्रियेत आणि तपास यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तसेच खरात स्वतःला ‘सिद्धपुरुष’ समजत असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं, ज्यामुळे तो लोकांवर मानसिक प्रभाव टाकून त्यांचा गैरफायदा घेत होता, असा आरोप आहे.

रिव्हॉल्वर व कारतुसे जप्त -

    पोलीस तपासादरम्यान खरातच्या ताब्यातून एक काळ्या रंगाची रिव्हॉल्व्हर, 31 जिवंत काडतुसे आणि 5 वापरलेली काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या शस्त्रसाठ्यामुळे प्रकरण अधिकच गंभीर बनलं आहे. या गोळ्यांचा वापर लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी किंवा कथित नरबळीच्या घटनांमध्ये झाला का, याचा तपास पोलीस करत आहेत.

    तपासाचा विस्तार-

    महिलेच्या लैंगिक शोषणाच्या तक्रारीपासून सुरू झालेला तपास आता नरबळीच्या संशयापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे पोलीस विविध कोनातून चौकशी करत असून, संभाव्य बळी, सहकारी आणि संबंधित ठिकाणांचा शोध घेतला जात आहे.

    प्रशासन सतर्क!

    या प्रकरणामुळे स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, अंधश्रद्धेविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.