जेएनएन, अमरावती: Shegaon to Pandharpur Palkhi Marg 2026: यंदा आषाढी वारी 25 जुलै 2026 रोजी आहे. आषाढी वारी (Ashadhi Ekadashi) निमित्त पंढरपुरात गोपाळांचा मेळा भरणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठूरायाच्या दर्शनासाठी आषाढी निमित्ताने राज्यातून परराज्यातून भाविक हे दर्शनासाठी येत असतात. संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यासोबत मोठ्या संख्येने भक्तगण पंढरपुरात दाखल होता. तसंच विदर्भातील सर्वांच्या आवडीची आणि मानाची संत गजानन महाराजांची पालखीही पंढरपुरात दाखल होत असते. या वारीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

21 जून रोजी श्रींच्या पालखीचे प्रस्थान (Sant Gajanan Maharaj Palkhi 2026)

प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगावच्या श्रींची पालखी पायी वारी निघणार आहे. तिचे रविवार, 21 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता शेगाव येथील श्री मंदिरातून पंढरपूरकडे प्रस्थान होईल. यंदा या वारीचे 57 वे वर्ष आहे. “पंढरीचा वारकरी, वारी चुकोने दे हरी” हा संदेश घेऊन हजारो वारकरी रामकृष्णहरी, ज्ञानेबा माऊली तुकाराम, श्री गजानन जय गजानन, विठ्ठल-विठ्ठल जय हरी नामाचा जयघोष करत सहभागी होतात.

gajanan maharaj shegaon news
गजानन महाराज मंदिर (सोशल मीडिया)

पालखीचा प्रमुख मार्ग (Sant Gajanan Maharaj Palkhi 2026 Marg)

श्री संत गजानन महाराज संस्थानने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, 21 जून ते 19 ऑगस्ट या कालावधीत बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, बीड, धाराशिव, सोलापूर आणि जालना अशा नऊ जिल्ह्यांतून पालखीचा 60 दिवसांचा आणि एकूण 1,206 किलोमीटरचा प्रवास होणार आहे.

फोटो - संत गजानन महाराज संस्थान

23 जुलै रोजी पालखी पंढरपुरात दाखल होणार 

    21 जून रोजी सकाळी शेगाव येथील समाधी मंदिर परिसरातून पालखीचे प्रस्थान होईल. 23 जून रोजी पालखी अकोल्यात पोहोचणार असून पुढे पातूर, रिसोड, सेनगाव, नरसी नामदेव, औढा नागनाथ, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, अंबाजोगाई, धाराशिव, तुळजापूर, सोलापूर आणि मंगळवेढा मार्गे प्रवास करणार आहे. 23 जुलै 2026 रोजी पालखी श्री क्षेत्र पंढरपूर येथे दाखल होणार आहे.

    पालखीचा परतीचा प्रवास 

    28 जुलैपर्यंत तेथे मुक्काम राहणार आहे. विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर २९ जुलै रोजी पालखी शेगावकडे परतीच्या प्रवासाला सुरुवात करेल. 

    वारीदरम्यान वारकऱ्यांसाठी पाणी, आरोग्य सुविधा, निवास व सुरक्षा व्यवस्थेची तयारी प्रशासन आणि संस्थानतर्फे करण्यात येत आहे. पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील भाविक मोठ्या संख्येने शेगावमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.