अमरावती. Samruddhi Mahamarg Accident News: समृद्धी महामार्गावर अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे परिसरात भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि बोलेरो टेम्पो-पिकअपमध्ये झालेल्या जोरदार धडकेत 7 जणांचा जागीच मृत्यू, तर 21 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक 97 जवळ हा अपघात झाला. अपघातानंतर महामार्गावर मोठी खळबळ उडाली.

दुर्गादेवीची मूर्ती घेऊन जाताना अपघात

प्राथमिक माहितीनुसार, बोलेरो टेम्पो-पिकअपमधून शेगाव येथून दुर्गादेवीची मूर्ती वर्ध्याकडे नेली जात होती. याचदरम्यान धामणगाव रेल्वे परिसरातील समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक 97 जवळ पिकअपची ट्रकसोबत जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की पिकअपमधील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. 

या अपघातात सात जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर 21 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी वर्धा येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करून उपचार सुरू आहेत.

मदतकार्यासाठी यंत्रणा घटनास्थळी

अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रवाना करण्यात आले. भीषण अपघातामुळे समृद्धी महामार्गावर काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला.

    दरम्यान, अपघात नेमका कशामुळे झाला, ट्रक आणि पिकअपची धडक कोणत्या परिस्थितीत झाली, याचा तपास सुरू आहे. वाहनांचा वेग, चालकाचे नियंत्रण आणि इतर संभाव्य कारणांची माहिती तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

    दुर्गादेवीची मूर्ती घेऊन वर्ध्याकडे निघालेल्या प्रवाशांवर धामणगावजवळ काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.