जेएनएन, मुंबई. Raigad News: महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध दिवेआगर समुद्रकिनारी गुरुवारी (१ ऑक्टोबर) दुर्दैवी घटना घडली. पुण्याहून सहलीसाठी आलेल्या आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. अचानक आलेल्या मोठ्या लाटा आणि समुद्राच्या खोलीचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील विनर्स अकॅडमी या खासगी कोचिंग क्लासचे 42 विद्यार्थी सहलीसाठी दिवेआगर येथे आले होते. या गटात इयत्ता 11वी आणि 12वीतील विद्यार्थ्यांचा समावेश होता.
दुपारच्या सुमारास गटातील आठ विद्यार्थी समुद्रात पोहण्यासाठी उतरले. त्याचवेळी समुद्रात जोरदार लाटा आणि पाण्याचा वेग वाढला. त्यामुळे हे आठही विद्यार्थी खोल पाण्यात ओढले गेले. काही वेळातच ते समुद्रात बुडाले.
मृत विद्यार्थ्यांची नावे
कैवल्य वासनकर, सोहम तुकाराम भांडवलकर, यश किरण वानखेडे, राजवील वहिले, कौस्तुभ संदीप दौंड, प्रणव बनसोडे, सुमीत अहिरे, तन्मय दत्तात्रय वाहिले अशी या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.
स्थानिकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले
घटनेची माहिती मिळताच समुद्रकिनारी एकच खळबळ उडाली. स्थानिक बचाव पथकांसह महाकाली वॉटर स्पोर्ट्सच्या कर्मचाऱ्यांनी, स्थानिक नागरिकांनी आणि घटनास्थळी उपस्थित पर्यटकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर आठही विद्यार्थ्यांना समुद्रातून बाहेर काढण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात
सर्व मृतदेह बोरली प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली.
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी सुरू असून पोलिसांकडून सहलीसोबत असलेल्या शिक्षकांसह इतर विद्यार्थ्यांकडून घटनेची माहिती घेतली जात आहे. समुद्रातील भरती-ओहोटी, पाण्याची खोली आणि लाटांची तीव्रता याबाबत पर्यटकांना अनेकदा अचूक माहिती नसते. त्यामुळे समुद्रात उतरताना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
या दुर्घटनेमुळे मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या संवेदना
रायगड जिल्ह्यातील दिघी सागरी, दिवेआगर येथे समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या आळंदी येथील विनर्स अकॅडमीच्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारी आहे. या दुर्घटनेतील मृत विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
“या दुःखद घटनेमुळे मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सहभागी आहोत,” असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
