जेएनएन, वाशिम: वाशिम जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. आजही जिल्ह्यातील तब्बल 60 टक्के पेट्रोल पंप इंधनाअभावी बंद आहेत. त्यामुळे नागरिक, शेतकरी, प्रवासी वाहनधारक आणि मालवाहतूक व्यवसायिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

‘नो डिझेल’ आणि ‘नो पेट्रोल’चे फलक 

इंधन टंचाईमुळे अनेक पेट्रोल पंपांवर ‘नो डिझेल’ आणि ‘नो पेट्रोल’चे फलक झळकत आहेत. ज्या काही पंपांवर इंधन उपलब्ध आहे, त्या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. अनेक वाहनधारकांना तासन्‌तास प्रतीक्षा करूनही रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे.

शेतकऱ्यांची मोठी गैरसोय 

शेतीकामासाठी डिझेलवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची कामे सुरू असताना ट्रॅक्टर, पंपसेट आणि शेती अवजारांसाठी डिझेल मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. दुसरीकडे प्रवासी वाहतूक आणि मालवाहतूक सेवांवरही या तुटवड्याचा परिणाम जाणवत आहे.

मर्यादित साठ्यामुळे विक्रीवरही निर्बंध 

    स्थानिक पेट्रोल पंप चालकांच्या माहितीनुसार, इंधन पुरवठ्यातील विस्कळीतपणा आणि टँकर उशिरा पोहोचत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. काही पंप चालकांनी मर्यादित साठ्यामुळे विक्रीवरही निर्बंध घातले आहेत

    परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू

    दरम्यान, प्रशासन आणि तेल कंपन्यांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावा करण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुढील एक-दोन दिवसांत पुरवठा सुरळीत झाला नाही, तर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.