जेएनएन, मुंबई. NEET-UG पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई करत शिवराज मोटेगावकर यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. पेपरफुटी रॅकेटशी संबंधित आर्थिक व्यवहार, परीक्षार्थी आणि एजंट यांच्यातील संपर्क तसेच प्रश्नपत्रिका लीकच्या साखळीतील भूमिकेच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आल्याचे माहिती समोर आली सांगितले.

मोटेगावकर यांच्याशी संबंधित ठिकाणी चौकशी

CBI च्या पथकाने पहाटेपासूनच मोटेगावकर यांच्याशी संबंधित ठिकाणी चौकशी आणि कागदपत्रांची पडताळणी सुरू केली होती. त्यानंतर त्यांना पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. तपास यंत्रणेकडून मोबाईल फोन, लॅपटॉप, आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे आणि काही डिजिटल पुरावे जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. 

या प्रकरणात यापूर्वीही अनेक संशयितांना अटक करण्यात आली असून महाराष्ट्रासह बिहार, गुजरात आणि दिल्लीपर्यंत तपासाची व्याप्ती वाढली आहे. लातूर आणि पुणे कनेक्शन समोर आल्यानंतर CBI अधिक आक्रमक झाली असून खासगी क्लासेस, मध्यस्थ आणि संशयित एजंटांच्या नेटवर्कची चौकशी सुरू आहे.

आणखी काही मोठी नावे समोर

माहितीनुसार, NEET परीक्षेपूर्वी काही विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेतील प्रश्न उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या पैशांची देवाणघेवाण झाल्याचा संशय आहे. मोटेगावकर यांच्याकडून मिळणाऱ्या माहितीनंतर आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणेकडून व्यक्त केली जात आहे. 

    दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. CBI कडून पुढील काही दिवसांत आणखी मोठ्या कारवाया होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.