जेएनएन, मुंबई. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व आठ लोकसभा खासदारांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली ही भेट झाली. राज्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मिळणाऱ्या मदतीसंदर्भात पंतप्रधानांशी चर्चा करण्यासाठी ही भेट असल्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सांगण्यात आले आहे.

मात्र, या भेटीमुळे शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत जाणार का? असा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे आगामी काळात महत्त्वाची विधेयके संसदेत येण्याची शक्यता असताना शरद पवार गटाच्या आठही खासदारांची पंतप्रधान मोदींसोबत झालेली भेट राजकीयदृष्ट्या चर्चेचा विषय ठरली आहे.

फडणवीस म्हणाले, मोदी कोणत्याही एका पक्षाचे पंतप्रधान नाहीत.

या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार गटाचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत असतील, तर त्यात काहीही वावगे नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ भाजपचे किंवा सत्ताधारी पक्षाचे पंतप्रधान नसून संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांचे खासदारही त्यांना भेटत असतात. त्याचप्रमाणे विविध विरोधी पक्षांचे नेते आपल्या कामांसंदर्भात आपल्यालाही भेटत असतात. त्यामुळे या भेटीकडे वेगळ्या राजकीय दृष्टिकोनातून पाहण्याची गरज नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. 

फडणवीस यांनी यापेक्षा एक पाऊल पुढे जात, “ते जर तिथे गेले असतील किंवा जाणार असतील, तर ती अतिशय चांगली गोष्ट आहे,” असेही म्हटले.

    नेमके कोणते आठ खासदार मोदींना भेटले?

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभेतील आठ खासदार या भेटीत सहभागी झाले. त्यामध्ये

    • सुप्रिया सुळे – बारामती
    • डॉ. अमोल कोल्हे – शिरूर
    • धैर्यशील मोहिते पाटील – माढा
    • भास्कर भगरे – दिंडोरी
    • सुरेश म्हात्रे (बाळ्यामामा) – भिवंडी
    • बजरंग सोनवणे – बीड
    • अमर काळे – वर्धा
    • निलेश लंके – अहमदनगर

    यांचा समावेश आहे. 

    शेतकरी आणि दुष्काळाच्या मुद्द्यावर चर्चा

    राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील काही भागांमध्ये निर्माण झालेली गंभीर दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांच्या समस्या आणि केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या मदतीबाबत पंतप्रधान मोदींसोबत चर्चा करण्यासाठी ही भेट आयोजित करण्यात आली होती.त्यामुळे ही भेट केवळ राजकीय स्वरूपाची नसून महाराष्ट्राशी संबंधित प्रश्न केंद्राच्या पातळीवर मांडण्यासाठी असल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे.