नवी दिल्ली: khaleda zia Passed away : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ढाका येथील अपोलो रुग्णालयात उपचारादरम्यान दीर्घ आजाराने निधन झाले. त्या 80 वर्षांच्या होत्या. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) च्या अध्यक्षा झिया यांनी मंगळवारी सकाळी 6 वाजता अखेरचा श्वास घेतला, असे त्यांच्या पक्षाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
23 नोव्हेंबर 2025 रोजी हृदय आणि फुफ्फुसाच्या संसर्गामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि गेल्या 36 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. बीएनपीच्या अध्यक्षा आणि माजी पंतप्रधान बेगम खालेदा झिया यांचे आज सकाळी 6.०० वाजता, फज्रच्या (सकाळच्या) नमाजानंतर निधन झाले, असे पक्षाने एका निवेदनात म्हटले आहे. आम्ही त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करतो आणि सर्वांना त्यांच्या दिवंगत आत्म्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती करतो, असे निवेदनात म्हटले आहे.
खालिदा अनेक आजारांनी होत्या ग्रस्त -
बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान झिया यांना बऱ्याच काळापासून यकृताचा सिरोसिस, संधिवात, मधुमेह आणि मूत्रपिंड, फुफ्फुसे, हृदय आणि डोळ्यांशी संबंधित जुनाट आजारांसह अनेक आरोग्य समस्या होत्या.
मेडिकल बोर्डच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते-
हृदयरोगतज्ज्ञ शहाबुद्दीन तालुकदार यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय मंडळाच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते, ज्यामध्ये बांगलादेश, ब्रिटन, अमेरिका, चीन आणि ऑस्ट्रेलियातील तज्ज्ञांचा समावेश होता. या महिन्याच्या सुरुवातीला, त्यांना उपचारांसाठी परदेशात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना हलवता आले नाही.
