एजन्सी, अस्ताना. अझरबैजान एअरलाइन्सचे विमान कझाकस्तानमध्ये लँडिंगदरम्यान कोसळले आहे. कझाकस्तानमधील अकताऊ शहराजवळ हा अपघात झाला. हे विमान अझरबैजानहून रशियाला जात होते. या विमानात 67 प्रवासी आणि 5 क्रू मेंबर्स होते. कझाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी 12 जणांचा जीव वाचल्याची माहिती दिली आहे. तर, आतापर्यंत 42 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली आहे. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (plane crashed in kazakhstan)

लँडिंगदरम्यान विमान जमिनीवर आदळले आणि आग लागल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. अपघातानंतर तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. अपघातातून बचावलेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेच्या सर्व पैलूंनी तपास

अझरबैजान एअरलाइन्सने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, बाकूहून चेचन्यासाठी एम्ब्रेयर 190 हे विमान फ्लाइट क्रमांक J2-8243 निघाले होते. मात्र, दाट धुक्यामुळे विमानाचा मार्ग वळवावा लागला होता. कझाकस्तानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते या घटनेच्या सर्व पैलूंनी तपास करत आहेत. या अपघातामागे काही तांत्रिक बिघाड असावा, असा अंदाज आहे.

विमानात 16 रशियन नागरिक-

⁕ विमानात अझरबैजानचे 37, कझाकिस्तानचे 6, किर्गिस्तानचे 3 आणि रशियाचे 16 नागरिक होते.

    ⁕ विमानात पाच कर्मचाऱ्यांसह 67 लोक होते.

    ⁕ अपघातस्थळी 150 बचाव कर्मचारी आणि 45 उपकरणे तैनात.

    ⁕ कझाकस्तानमधील अकताऊ येथे हे विमान कोसळले.

    ⁕ कझाकिस्तानच्या आपत्कालीन मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत 42 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती.

    ⁕ आपत्कालीन क्रमांक जारी केले आहेत: 87292319099

    हॉस्पिटलमध्ये राखीव खाटा

    मँगिस्टौ प्रदेशातील रुग्णालयात, शस्त्रक्रिया आणि ट्रॉमा युनिटमध्ये 30 खाटा आणि अतिदक्षता विभागात 10 खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर प्रादेशिक बालरुग्णालयात सर्वसाधारण वॉर्डमध्ये 20 आणि आयसीयूमध्ये 10 खाटा राखीव ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

    आतापर्यंत 13 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर 5 जणांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. 11 वर्षीय मुलावर बाल रुग्णालयातील आपत्कालीन कक्षात उपचार सुरू आहेत.

    आगीचा उडाला भडका
    या विमान अपघाताचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लँडिंग दरम्यान विमान कोसळताच तेथे आगीचा भडका उडाल्याचे दिसून आले आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे.