जेएनएन, मुंबई. मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम अभिनेत्री दया डोंगरे यांचे निधन (Daya Dongre Passes Away) झाले आहे. त्यांनी वयाच्या 85 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

दया डोंगरे यांनी आपल्या अभिनयाने मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमध्ये रसिकांच्या मनावर अमिट ठसा उमठवला होता. एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टीतील खलनायकीचे प्रतिकात्मक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असे. 

कला विश्वाच्या एका युगाचा अस्त

आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर मराठी मालिका आणि चित्रपट सृष्टीत एक अढळ स्थान निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांच्या निधनाची बातमी ऐकून अतीव दुःख झाले. महाराष्ट्रातील अभिनय आणि कला विश्वाच्या एका युगाचा अस्त झाला आहे. 

खट्याळ सासू नाठाळ सून, नवरी मिळे नवऱ्याला, नकाब, लालची, कुलदीपक यांसारख्या अनेक चित्रपट तसेच गजरा, चार दिवस सासूचे यांसारख्या मालिकांमध्ये आपल्या चतुरस्त्र अभिनयाने दया डोंगरे यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे, अशा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

दया डोंगरे यांची कारकिर्द

    दया डोंगरे यांनी विविध चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये स्मरणीय भूमिका साकारल्या. दूरदर्शनवरील गजरा मालिकेतून त्यांनी लोकप्रियता मिळवली. खट्याळ सासू, नकाब, लालची, चार दिवस सासूचे, कुलदीपक या मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी खास्ट सासूची भूमिका प्रभावीपणे निभावली. 

    तुझी माझी जमली जोडी रे, नांदा सौख्य भरे, लेकुरे उदंड झाली, आव्हान, स्वामी या मालिकांमधील त्यांचे अभिनयाचे प्रदर्शन प्रेक्षकांच्या आठवणीत राहिले. मराठी सोबतच त्यांनी आश्रय, जुंबिश, नामचीन, दौलत कि जंग या हिंदी सिनेमांतही काम केले. 

    दया डोंगरे यांचे अभिनयाने पडद्यावर निर्माण केलेले अमिट ठसा आणि रसिकांच्या मनावर पाडलेली छाप नेहमीच आठवणीत राहणार आहे. 

    दया डोंगरे यांच्या विषयी थोडक्यात माहिती

    11 मार्च 1940 रोजी दया यांचा जन्म अमरावतीमध्ये त्यांच्या आजोळी झाला. वडिलांच्या बदलीच्या नोकरीमुळे त्यांनी कर्नाटकातील धारवाडमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले होते. अभिनयात पुढे वाटचाल करण्यासाठी त्यांनी पुण्यामध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर नाट्यशास्त्रचे शास्त्रोक्त शिक्षण घेण्याच्या हेतूने दिल्लीत प्रख्यात 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'मध्ये (NSD) प्रवेश घेतला.