जेएनएन, मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे निधन झाले आहे. ते 74 वर्षांचे होते. ‘गजनी’ चित्रपटातील प्रभावी खलनायकाच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या प्रदीप रावत यांनी हिंदीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाने बॉलिवूड आणि दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

प्रदीप रावत गेल्या काही वर्षांपासून रक्ताच्या कर्करोगाशी झुंज देत होते. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. मात्र काही महिन्यांपूर्वी आजार पुन्हा बळावल्याने त्यांची प्रकृती खालावली. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर मंगळवारी सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती समोर आली आहे.  

‘गजनी’मधील खलनायकाची भूमिका ठरली अविस्मरणीय 

आमिर खानच्या ‘गजनी’ चित्रपटात प्रदीप रावत यांनी साकारलेली खलनायकाची भूमिका प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहे. त्यांच्या दमदार देहयष्टीला साजेसा अभिनय, गंभीर आवाज आणि प्रभावी पडद्यावरील उपस्थितीमुळे ‘गजनी’ हे पात्र चित्रपटातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या भूमिकांपैकी एक ठरले. या भूमिकेमुळे त्यांना देशभरात मोठी लोकप्रियता मिळाली.

‘लगान’मधील भूमिकेनेही जिंकली मने 

आमिर खानच्या ‘लगान’ या गाजलेल्या चित्रपटातही प्रदीप रावत यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. ‘देवा’ या व्यक्तिरेखेतून त्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. ‘लगान’ आणि ‘गजनी’ या दोन वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका अभिनयातून पाहायला मिळाल्या.  

    हिंदीसह दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही दबदबा 

    प्रदीप रावत यांनी केवळ बॉलिवूडपुरते स्वतःला मर्यादित ठेवले नाही. त्यांनी तेलुगू, तमिळ, कन्नड आणि इतर भारतीय भाषांतील चित्रपटांमध्येही काम केले. खलनायक, अॅक्शन भूमिका आणि प्रभावी व्यक्तिरेखा साकारण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या अभिनयातील सहजता आणि भारदस्त व्यक्तिमत्त्वामुळे ते दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही लोकप्रिय झाले. 

    ‘महाभारत’मधील अश्वत्थामाची भूमिकाही गाजली 

    चित्रपटांपूर्वी प्रदीप रावत यांनी छोट्या पडद्यावरही आपली छाप सोडली होती. लोकप्रिय दूरचित्रवाणी मालिका ‘महाभारत’मध्ये त्यांनी साकारलेली अश्वत्थामाची भूमिका विशेष गाजली. त्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश करत विविध भाषांतील अनेक चित्रपटांमध्ये संस्मरणीय भूमिका केल्या.

    कलाविश्वातून श्रद्धांजली 

    प्रदीप रावत यांच्या निधनाची बातमी समोर येताच चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी आणि चाहत्यांनी सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली. अभिनेता सोनू सूद यांनीही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीने एक दमदार व्यक्तिमत्त्व आणि बहुआयामी अभिनेता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.  

    प्रदीप रावत यांच्या निधनाने ‘गजनी’तील धडकी भरवणारा खलनायक, ‘लगान’मधील प्रभावी सहकलाकार आणि दक्षिणात्य चित्रपटांतील दमदार अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या संस्मरणीय भूमिका मात्र प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहतील.