जेएनएन, दिल्ली. दिल्लीतील मराठी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण आता त्यांना दिल्लीत मराठी चित्रपटांची मेजवाणी मिळणार आहे आणि तिही मोफत… सत्यशोधक, गांधी टॉक्स, सामना, आशा, स्थळ, तुंबाडची मंजुळा, देऊळ बंद 2 असे अनेक पुरस्कारप्राप्त चित्रपट पाहण्याची त्यांना संधी मिळणार आहे.

दिल्लीत 7, 8 आणि 9 ऑगस्ट दरम्यान दिल्ली मराठी चित्रपट महोत्सव साजरा होत आहे. या चित्रपट महोत्सवाचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यामुळे दिल्लीतील मराठीजणांना लाईट्स... कॅमेरा... ॲक्शन… चा थरार ही अनुभवता येणार आहे.

दिल्ली मराठी चित्रपट महोत्सवामध्ये FTII मास्टरक्लास मालिकेचेही आयोजन करण्यात आले आहे. या मास्टरक्लासमध्ये प्रा. डॉ. मिलिंद दामले हे मार्गदर्शन करणार आहेत. विशेष म्हणजेच याचे एक प्रमाणपत्रही मिळणार आहे. मात्र,  यासाठी तुम्हाला तीनही दिवस  मास्टरक्लासला उपस्थीत राहणे आवश्यक आहे. 

सामना चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग

सामना चित्रपटाला 50 वर्ष झाली आहेत. त्यानिमित्ताने या ऐतिहासिक चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग या महोत्सवात होणार आहे. तसेच या चित्रपटाचे निर्माते रामदास फुटाणे यांच्याशी संवाद होणार आहे. 

7, 8 आणि 9 ऑगस्ट दरम्यान जंतर-मंतर परिसरातील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर मध्ये आयोजन करण्यात आले आहे. या चित्रपट महोत्सवात विविध लघुकथा चित्रपटांचेही स्क्रिनिंग होणार आहे. त्यामुळे दिल्लीतील हा मराठी चित्रपट महोत्सव खास होणार आहे.

    चित्रपट महोत्सवाचे वेळापत्रक आणि नोंदणी 

    चित्रपट महोत्सवात विविध चित्रपटांची मेजवाणी मिळणार आहे. यासाठी आपल्याला नोंदणी करणे अनिवार्य आहे. प्रवेश मोफत आहे मात्र मर्यादित जागा असल्याने आपली नोंदणी लवकरात लवकर करावी. यासाठी तुम्ही https://delhimarathi.org/announcement/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.