जेएनएन, मुंबई: मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय आणि वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘मराठी बिग बॉस’च्या नव्या पर्वाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळणार असून, नवीन वर्षात 11जानेवारी 2026 पासून ‘मराठी बिग बॉस’चा नवा सिझन सुरू होणार आहे. हा शो प्रेक्षकांना दररोज रात्री 8  वाजता पाहता येणार आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, यंदा भव्य सेट, नवे टास्क आणि अधिक रंगतदार स्पर्धा पाहायला मिळणार आहे. नेहमीप्रमाणेच मनोरंजन, भांडणं, मैत्री, डावपेच आणि भावनांचा जोरदार तडका यंदाही प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. या नव्या पर्वात कोणते कलाकार, सेलिब्रिटी किंवा चर्चित चेहरे घरात सहभागी होणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी संभाव्य स्पर्धकांची यादी सोशल मीडियावर चर्चेत आहे. तसेच, सूत्रसंचालनाची धुरा कोण सांभाळणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, कलर्स मराठीने ‘मराठी बिग बॉस’चा एक दमदार प्रोमो शेअर केला असून कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “आता सगळे होणार बेभान… रितेश भाऊ घेऊन येत आहेत महाराष्ट्राचं तुफान! 11Cजानेवारीपासून दररोज रात्री 8Nवा. पाहा #BiggBossMarathiS6 कलर्स मराठी आणि @jiohotstar वर.” या प्रोमोवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत शोबद्दलची उत्सुकता व्यक्त केली आहे.

एकूणच, शोच्या प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली असून ‘मराठी बिग बॉस’ नवीन वर्षात पुन्हा एकदा प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणार, यात शंका नाही. आता फक्त त्या दिवसाची वाट पाहावी लागणार आहे, जेव्हा ‘मराठी बिग बॉस’च्या घराचे दरवाजे पुन्हा एकदा उघडतील.