जेएनएन, पुणे. Rahul Neha Deshpande Divorce : राष्ट्रीय पुरस्कार विजेते मराठीतील प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांचा संसार मोडला आहे. राहुल देशपांडे व त्यांची पत्नी नेहा देशपांडे यांनी 17 वर्षांच्या वैवाहिक नात्यानंतर एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांनीही हा निर्णय पूर्णपणे मैत्रीपूर्ण पद्धतीने घेतल्याची माहिती राहुल देशपांडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून दिली आहे.
आपल्या सुमधूर आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे सध्या आपल्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. राहुल देशपांडेने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पत्नीपासून घटस्फोट घेतल्याचे जाहीर केले. लग्नाच्या 17 वर्षानंतर पत्नी नेहापासून विभक्त होण्याचा निर्णय राहुलने घेतला आहे.
सह-पालकत्वाचा निर्णय!
राहुल आणि नेहा यांना एक मुलगी रेणुका आहे. दोघांनीही आपल्या मुलीच्या संगोपनाची जबाबदारी एकत्रितपणे पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेणुकाच्या संगोपनात कोणतीही उणीव भासू नये, याकडे त्यांचा विशेष भर असेल. राहुल देशपांडे आणि नेहा यांनी त्यांच्या खासगी आयुष्याला नेहमीच प्रसिद्धीच्या झोतातून दूर ठेवले. विभक्त होण्याच्या निर्णयाची माहिती सार्वजनिक करण्यापूर्वी त्यांनी जवळच्या मित्रपरिवाराला आणि कुटुंबियांना याची कल्पना दिली होती.
घटस्फोटाची अधिकृत घोषणा-
राहुल देशपांडे यांनी फेसबुक पोस्टद्वारे अधिकृत घोषणा केली. त्यांनी आपल्या चाहत्यांना आणि मित्रांना कळवले की, आम्ही दोघांनी हा निर्णय परस्पर संमतीने घेतला आहे. आमचं वैयक्तिक आयुष्य वेगळं झालं असलं तरी मुलगी रेणुकासाठी आम्ही नेहमीच एकत्र राहू.
राहुल यांची संगीत कारकिर्द -
भारतीय शास्त्रीय संगीत विश्वात राहुल देशपांडेंचे नाव आदराने घेतले जाते. पं. कुमार गंधर्वांच्या परंपरेतील गायक म्हणून त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. गायकीसोबतच त्यांनी संगीत दिग्दर्शन, चित्रपट, नाट्यगायन आणि सर्जनशील प्रयोगांमधून स्वतःला सिद्ध केले आहे.