जेएनएन, मुंबई. Mumbai News: मुंबईतील जुहू परिसरात रविवारी संध्याकाळी बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर अज्ञात हल्लेखोरांकडून गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेनंतर लगेचच अमेरिकेत असलेल्या गँगस्टर अनिल पंडितने हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये काही अज्ञात हल्लेखोर हे टायगरच्या गाडीवर गोळ्या झाडतांना दिसत आहे. त्यांनी टायगरच्या गाडीवर 5 गोळ्या झाडल्या असे राऊंडच्या आवाजावरून दिसत आहे.

टायगर श्रॉफ थोडक्यात बचावला

मुंबईतील जुहू परिसरात टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत टायगर श्रॉफ बचावला असला, तरी त्याला आणि त्याच्या चालकाला दुखापत झाली आहे. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

    बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाचा त्वरित तपास करून गोळीबारात सहभागी असलेल्या दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. 

    एकनाथ शिंदेंनी दिली भेट

    या घटनेनंतर टायगरचा परिवार दहशतीखाली आणि चिंतेत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिंदे यांनी रात्री उशिरा त्याच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी टायगरच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्याच्या कुटुंबीयांना धीर दिला. सार्वजनिक व्यक्तींना धमकावण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत आणि या प्रकरणातील आरोपींना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी भूमिका शिंदे यांनी मांडली. 

    विरोधक आक्रमक

    अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर मुंबईतील जुहू परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेवरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडल्याचा आरोप करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.