जेएनएन, मुंबई. अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर मुंबईतील जुहू परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेवरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडल्याचा आरोप करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
एखाद्या प्रसिद्ध अभिनेत्यावर मुंबईसारख्या महानगरात गोळीबार होत असेल, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी कोण देणार, असा सवालही सपकाळ यांनी उपस्थित केला आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महाराष्ट्रात महायुती सरकारने ‘जंगलराज’ निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला. गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही आणि पोलीस प्रशासनावर मुख्यमंत्र्यांचे नियंत्रण नसल्याचा दावाही त्यांनी केला.
‘सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी कोण देणार?’
टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराचा संदर्भ देत सपकाळ यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीवर चिंता व्यक्त केली. मुंबईसारख्या शहरात भररस्त्यात गोळीबार होत असेल, तर सर्वसामान्य नागरिक किती सुरक्षित आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
सपकाळ यांच्यानुसार, राज्यात गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवण्यात सरकार अपयशी ठरत आहे. गुन्हेगारांना कायद्याची भीती उरलेली नसल्याचा आरोप करत त्यांनी पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही टीका केली. टायगर श्रॉफवरील हल्ल्याच्या निमित्ताने त्यांनी राज्य सरकारला कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर धारेवर धरले.
VIDEO | Mumbai: CCTV footage of gunmen opening fire at Bollywood actor Tiger Shroff's car in Juhu on Sunday evening. (Source: Mumbai Police) (Full video available on PTI Videos - https://t.co/d8jp61yd2p) https://t.co/XkUFXj5SlB
— Press Trust of India (@PTI_News) October 19, 2026
देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रीपदासोबतच गृहखात्याची जबाबदारी असल्याने सपकाळ यांनी त्यांच्यावर थेट निशाणा साधला. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून फडणवीस अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यातील नागरिकांना सुरक्षित वातावरण देण्याची जबाबदारी सरकारची असल्याचे सांगत, नैतिक जबाबदारी स्वीकारून फडणवीस यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी सपकाळ यांनी केली.
