जेएनएन, मुंबई. मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV वरील 'कोण होणार करोडपती'च्या या  कार्यक्रमाच्या नव्या पर्वाची घोषणा करण्यात आली आहे. या पर्वात प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

'कोण होणार करोडपती'च्या नव्या पर्वाची सूत्रं माधुरी दीक्षित यांच्याकडे

महाराष्ट्रातल्या घराघरांत पोहोचलेल्या या कार्यक्रमात आता अभिनेत्री माधुरी दीक्षित सूत्रसंचलिकेच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांनी गेली अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. आता त्या आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीत 'कोण होणार करोडपती'च्या नव्या पर्वाची सूत्रं हाती घेणार आहेत.  

ज्ञानाच्या बळावर स्वप्नांना नवी दिशा देणारा, सामान्य माणसाच्या असामान्य प्रवासाला व्यासपीठ देणारा आणि प्रत्येक प्रश्नातून आयुष्य बदलण्याची संधी निर्माण करणारा हा कार्यक्रम यंदाही प्रेरणांचा, आशांचा आणि नव्या शक्यतांचा उत्सव ठरणार आहे.         

'कोण होणार करोडपती' एका नव्या पर्वात प्रवेश करत आहे. यंदा माधुरी दीक्षित यांच्या येण्यानं या मंचावर नवा दृष्टीकोन, नवी ऊर्जा आणि एक वेगळी उब अनुभवायला मिळणार आहे... कारण 'आता खेळ बदलणार...!'

या नव्या प्रवासाविषयी बोलताना माधुरी दीक्षित म्हणाल्या... 

    ‘कोण होणार करोडपती' हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर महाराष्ट्रातल्या लाखो कुटुंबांच्या आशांचा, स्वप्नांचा आणि ज्ञानावरच्या विश्वासाचा उत्सव आहे. अशा प्रतिष्ठित मंचाचा भाग होण्याची संधी मिळणं हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. एक महाराष्ट्रीय म्हणून या मंचावर येणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाच्या जिद्दीचा, संघर्षाचा आणि त्याच्या स्वप्नांचा प्रवास जवळून अनुभवण्याची, त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या क्षणांची साक्षीदार होण्याची संधी मला मिळते आहे याचा मला विशेष आनंद आहे आणि या नव्या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.’