जेएनएन, मुंबई: अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता हिमांशू मल्होत्रा यांच्या नात्याबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू आहेत. अमृता खानविलकर पतीपासून वेगळ्या राहत असून, लवकरच दोघांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चांनाही सोशल मीडियावर उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेत्रीने अशा प्रकारच्या अफवा आणि बदनामीकारक माहिती प्रसारित करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा यांच्या कायदेशीर पथकाने सोशल मीडियावर एक अधिकृत निवेदन शेअर केले आहे. या निवेदनात अमृता खानविलकर यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर निराधार, बदनामीकारक किंवा गोपनीयतेचा भंग करणारी माहिती प्रसारित केली जात असल्याचे म्हटले आहे.
अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
निवेदनात म्हटले आहे की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचा आदर केला जात असला तरी अमृता खानविलकर यांच्याविषयी बदनामीकारक विधाने, अफवा, असत्यापित आरोप किंवा दिशाभूल करणारी माहिती प्रकाशित, प्रसारित किंवा शेअर करण्यासाठी या अधिकाराचा गैरवापर गंभीरपणे घेतला जाईल.
तसेच, उपलब्ध पुराव्यांच्या आधारे अशा प्रकारची सामग्री तयार करणे, प्रकाशित करणे, प्रसारित करणे किंवा शेअर करण्यासाठी जबाबदार असलेल्या व्यक्ती, संस्था किंवा संघटनांविरोधात लागू कायद्यानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
अशा घटनांवर लक्ष ठेवले जात असून, कायदेशीर कारवाईसाठी संबंधित प्रकरणांची नोंद केली जात असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
अमृता-हिमांशू यांचा विवाह कधी झाला?
अमृता खानविलकर या मराठी तसेच हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. हिमांशू मल्होत्रा हे देखील हिंदी चित्रपट आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील अभिनेते आहेत. दोघांनी २०१५ मध्ये विवाह केला. त्यापूर्वी त्यांनी 'नच बलिए ७' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये एकत्र सहभाग घेतला होता आणि या पर्वाचे विजेतेपदही पटकावले होते.
सध्या त्यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर विविध दावे केले जात असले तरी, अभिनेत्रीने या अफवांवर थेट भाष्य करण्याऐवजी कायदेशीर निवेदनाद्वारे अशा प्रकारची माहिती प्रसारित करणाऱ्यांना इशारा दिला आहे.
हेही वाचा: महेश मांजरेकर यांच्या ‘दशमी’चे पोस्टर लाँच; ऑक्टोबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार चित्रपट
