जेएनएन, मुंबई: राज्यातील वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेत आणखी एक महत्त्वाचा टप्पा सुरू झाला आहे. एमबीबीएस अभ्यासक्रम प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीसाठी कॉलेज पसंतीक्रम (Preference Filling) भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. 28 ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन पर्याय भरता येणार आहे.

30 ऑक्टोबर रोजी यादी होणार जाहीर

ही प्रक्रिया राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (CET Cell, Maharashtra) राबविली जात आहे. 30 ऑक्टोबर रोजी तिसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी (Merit List) प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार व पसंतीनुसार महाविद्यालये देण्यात येणार आहे.

8338 एमबीबीएस जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू

राज्यात यंदा एकूण 8338 एमबीबीएस जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. सरकारी, शासकीय साहाय्यित, नगरपालिका तसेच खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील या सर्व जागांसाठी CET सेलमार्फत एकत्रितपणे प्रवेश दिला जात आहे.

शेवटची मोठी संधी 

    तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळविण्याची ही शेवटची मोठी संधी असल्याने वैद्यकीय शाखेतील विद्यार्थी व पालकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. विशेषतः पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही फेरी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. 

    CET सेलकडून विद्यार्थ्यांना सूचना!

    • पसंतीक्रम भरताना काळजीपूर्वक कॉलेजांची निवड करावी. 
    • एकदा पर्याय लॉक केल्यानंतर ते बदलता येणार नाहीत. 
    • विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळावरून (https://cetcell.net) वेळोवेळी सूचना तपासत राहावे. 

    दरम्यान, वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणि गती राखण्यासाठी राज्य सरकारने विशेष समिती नियुक्त केली आहे. या समितीच्या देखरेखीखाली तिसऱ्या फेरीतील सर्व टप्पे पार पाडले जाणार आहेत.