जेएनएन, पुणे. TET 2026 Date: महाराष्ट्रातील शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी महत्त्वाची असलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2026 येत्या 28 जून रोजी राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेचे आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या वतीने करण्यात आले असून, परीक्षेच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. (Maharashtra Teacher Eligibility Test Exam Date)

केंद्रावर वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन

परीक्षेचे नियोजन सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पडावे यासाठी परिषदेकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली असून, उमेदवारांना प्रवेशपत्रावरील केंद्रावर वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

दीड तास आधी उपस्थित राहण्याच्या सूचना 

परीक्षार्थींनी परीक्षा केंद्रावर किमान दीड तास आधी पोहोचावे, असे स्पष्ट निर्देश परिषदेकडून देण्यात आले आहेत. प्रवेशपत्र पडताळणी, ओळखपत्र तपासणी आणि सुरक्षा तपासणीसाठी अतिरिक्त वेळ लागू शकतो. त्यामुळे शेवटच्या क्षणी केंद्रावर पोहोचल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. 

आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत 

    उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर जाताना खालील कागदपत्रे सोबत ठेवणे आवश्यक आहे:

    • प्रवेशपत्र (Admit Card)
    • आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा अन्य वैध फोटो ओळखपत्र
    • परिषदेकडून सूचित करण्यात आलेली अन्य कागदपत्रे आवश्यक आहे. कागदपत्रांशिवाय किंवा उशिरा पोहोचणाऱ्या उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारला जाऊ शकतो.

    नियमांचे पालन करण्याचे आवाहन

    परीक्षेदरम्यान मोबाईल फोन, स्मार्टवॉच, ब्लूटूथ उपकरणे, कॅल्क्युलेटर तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंना बंदी असणार आहे. गैरप्रकार टाळण्यासाठी केंद्रांवर कडक देखरेख ठेवण्यात येणार आहे. 

    हजारो उमेदवारांची परीक्षा 

    महाराष्ट्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक पदासाठी पात्रता मिळविण्यासाठी टीईटी परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. यंदाही राज्यभरातून मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज केले असून, परीक्षेसाठी व्यापक तयारी करण्यात आली आहे.परिषदेकडून उमेदवारांना शांत मनाने परीक्षा देण्याचे तसेच प्रवेशपत्रावरील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून त्यांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 28 जून रोजी होणाऱ्या या परीक्षेकडे राज्यातील शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांचे लक्ष लागले आहे.