जेएनएन, मुंबई: राज्यातील पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांला विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद पाहून प्रवेशाची अंतिम मुदत 14 ऑगस्टवरून दि. 4 सप्टेंबर 2025 पर्यंत (polytechnic admission last date) करण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांसाठी (Maharashtra Polytechnic Admission 2025) यावर्षी विद्यार्थ्यांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून, 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी आतापर्यंत 1 लाख 3115 विद्यार्थ्यांनी प्रथम वर्ष डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. हा मागील दहा वर्षांतील सर्वोच्च आकडा असून, प्रवेशाची टक्केवारी तब्बल 93 टक्क्यांवर पोहोचली आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

म्हणून देण्यात आली मुदतवाढ 

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, तंत्रशिक्षण संचालनालयाने राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे आणि प्रवेश वाढीसाठी केलेल्या उपाययोजनांमुळे पॉलीटेक्निकमधील प्रवेशात मागील दहा वर्षांतील विक्रम झाला आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या वेळापत्रकानुसार 14 ऑगस्ट हा अंतिम दिनांक निश्चित करण्यात आला होता; मात्र दहावी पुरवणी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी मिळावी, तसेच सणासुदीच्या सुट्ट्यांचा विचार करून मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थी 4 सप्टेंबर 2025 पर्यंत संस्थांमध्ये जाऊन रिक्त जागांवर प्रवेश घेऊ शकतील. हीच अंतिम तारीख थेट द्वितीय वर्ष प्रवेश, तसेच बारावीनंतरच्या एचएमसीटी व सरफेस कोटिंग पदविका अभ्यासक्रमांसाठी लागू असेल. 

विक्रमी प्रतिसाद 

दहावीनंतरचे पदविका अभ्यासक्रम हे विद्यार्थ्यांसाठी रोजगार व उच्च शिक्षणाचा उत्तम पर्याय ठरत असून, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डाटा सायन्स, रोबोटिक्स यांसारखे नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती मोहिमा, उद्योग क्षेत्राशी सामंजस्य करार आणि स्वयंअध्ययन मूल्यांकन यांसारख्या उपक्रमांमुळे हा विक्रमी प्रतिसाद मिळाल्याचेही मंत्री चंद्रकांतपाटील यांनी यावेळी सांगितले.