जेएनएन, मुंबई. 11th Admission Maharashtra: इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी येणाऱ्या सर्व अडचणी दूर करण्यात येत आहेत. नोंदणी प्रक्रियेच्या पहिल्या फेरीमधील नोंदणीमध्ये 1 जून सायंकाळी 6 वाजेपर्यंत 10 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती सहसंचालक (माध्यमिक) डॉ.श्रीराम पानझाडे यांनी दिली आहे.

प्रक्रिया सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु

प्रवेश प्रक्रियेतील पहिली फेरी सुरू झाल्यानंतर संपूर्ण राज्यातून विद्यार्थी नोंदणी करत असून संकेतस्थळावर ताण येत असल्याने थोड्या प्रमाणात संकेतस्थळ संथ गतीने चालणे तसेच प्रवेश शुल्क भरण्यामध्ये अडचणी कॉलेज पसंतीक्रम भरण्यामध्ये अडथळे येणे, अशा अडचणी निदर्शनास आल्या आहेत. याबाबींवर संबंधित कंपनीमार्फत तत्काळ उपायोजना करत पर्यायी व्यवस्था करुन प्रक्रिया सुरळीत करण्याचा प्रयत्न केला आहे. 

अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्यापूर्वी प्रत्येक तक्रार दूर करणार

विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेचा नोंदणी अर्ज भरण्याकरिता 26 मे 2025 ते 3 जून 2025 पर्यंतचा एकूण नऊ दिवसांचा पुरेसा कालावधी देण्यात आला आहे. या फेरीची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याची तक्रार असल्यास अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्यापूर्वी प्रत्येक तक्रार दूर केली जाईल, असेही विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. ही सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडली जात असून कोणत्याही विद्यार्थ्याने काळजी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

    26 मे पासून विद्यार्थी नोंदणी सुरू

    अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावरील काही बदल नवीन पर्याय समाविष्ट करणे आवश्यक असल्याने त्याबाबतचे काम सुरू होते. यादरम्यान क्षेत्रिय स्तरावरुन आणि तज्ज्ञांकडून प्राप्त होणारे बदल यामुळे संकेतस्थळ तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण करण्यासाठी काही कालावधी लागला. त्यामुळे प्रक्रियेत जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार 21 मे 2025 पासून प्रत्यक्ष विद्यार्थी नोंदणी सुरू करणे शक्य झाले नाही. यानंतर संकेत स्थळाबाबत तांत्रिक अडचणी दूर करुन 26 मे 2025 पासून विद्यार्थी नोंदणी सुरू करण्यात आली. या बदलाबाबत संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे) यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे स्पष्टीकरण देखील दिलेले आहे.

    2025-26 पासून संपूर्ण राज्यात प्रवेश प्रकिया राबविण्यात येणार असल्याने यामध्ये 9342 कनिष्ठ महाविद्यालयांमधून 20 लाख 88 हजारांहून अधिक विद्यार्थी प्रवेश क्षमता उपलब्ध झाली असल्याचेही शालेय शिक्षण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.