नवी दिल्ली: उदारीकरणामुळे भारतातील बाजारपेठांमध्ये स्पर्धा वाढल्याचा दावा केला जात असला तरी, भारतातील कॉर्पोरेट जगताच्या तिजोरीची सूत्रे अजूनही काही मोजक्या लोकांच्या हातातच आहेत. एका ताज्या अभ्यासातून हे धक्कादायक सत्य समोर आले आहे की, केवळ पाच मोठ्या कौटुंबिक व्यवसायांकडे भारताच्या कॉर्पोरेट उत्पन्नापैकी 60 टक्क्यांहून अधिक वाटा आहे.
एका अहवालानुसार, 10 ऑगस्ट रोजी 'वर्ल्ड बँक इकॉनॉमिक रिव्ह्यू'मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात भारतीय उद्योगपतींच्या मक्तेदारीबाबत हे मोठे दावे करण्यात आले आहेत.
भारतातील कॉर्पोरेट जगतातील 'बिग 5' कोण?
अभ्यासानुसार, 2001 ते 2020 या दोन दशकांमध्ये भारताच्या व्यावसायिक महसुलापैकी 60% पेक्षा जास्त महसुलावर नियंत्रण ठेवणारी 'बिग 5' घराणी म्हणजे रिलायन्स, अदानी, टाटा, आदित्य बिर्ला आणि ओम प्रकाश जिंदाल ग्रुप आहेत.
कमाईचे गणित?
रिलायन्स आणि अदानी समूह पहिल्या पाच समूहांमध्ये आघाडीवर आहेत. त्यांनी एकत्रितपणे एकूण महसुलात किमान 20% वाटा सातत्याने राखला आहे. अभ्यासानुसार, टाटा आणि जिंदाल समूहांच्या महसुलात स्थिर वाढ झाली आहे, परंतु एकूण महसुलातील त्यांचा वाटा 10% पेक्षा कमी राहिला आहे. दरम्यान, अभ्यासाच्या कालावधीत बिर्ला समूहाचा एकूण सकल महसुलातील वाटा हळूहळू कमी झाला आहे, तरीही त्यांचा बाजारातील प्रभाव मजबूत राहिला आहे.
कोणी बजावली महत्त्वाची भूमिका ?
या मक्तेदारीचा अंदाज यावरून लावता येतो की, 2020 साली देशातील शीर्ष 25 कुटुंबांचे उत्पन्न भारताच्या एकूण सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (GDP) 15% पेक्षा जास्त होते.
अहवालानुसार, 2000 ते 2010 दरम्यान या कौटुंबिक व्यवसायांनी विविध क्षेत्रांमध्ये वेगाने विस्तार केला. अभ्यासात असे आढळून आले की, 74% पेक्षा जास्त एनआयसी-3 (राष्ट्रीय औद्योगिक वर्गीकरण) उद्योगांमध्ये, या "बिग 5" कंपन्यांचे निम्म्याहून अधिक महसुलावर थेट नियंत्रण आहे.
