मुंबई : महाराष्ट्रातील अमरावती येथील कुमकुम मोहोद हिने जेव्हा तिरंदाजीला सुरुवात केली, तेव्हा या खेळासाठी लागणाऱ्या साहित्याचा खर्च उचलणे हेच तिच्यासाठी मोठे आव्हान होते. तिचे वडील अनिल मोहोड यांनी तिच्यासाठी तिरंदाजीच्या बुटांची पहिली जोडी 400 रुपयांना खरेदी केली होती. त्यानंतर तिने पारंपरिक भारतीय लाकडी धनुष्याऐवजी रिकर्व्ह धनुष्याचा वापर सुरू केला, तेव्हा बुटांच्या पुढील जोडीसाठी 1,600 रुपये खर्च करावे लागले. आज वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी कुमकुमकडे बुटांच्या दहा जोड्या आणि तीन धनुष्ये आहेत. प्रायोजकही तिच्यामध्ये रस दाखवू लागले आहेत. 2016 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये तिचा समावेश झाला आहे.

कुमकुमचा प्रवास अनेक त्यागांनी भरलेला आहे. कोविड महामारीच्या काळात एकदा ती रडत होती. तिचे बाण तुटले, तर नवीन बाण खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याने काय करायचे, अशी चिंता तिला सतावत होती. बाणांच्या कमतरतेचा परिणाम आपल्या कामगिरीवर होत असल्याचेही तिला जाणवत होते. दुसऱ्याच दिवशी तिचे वडील अनिल यांनी १५,००० रुपयांचे बाण खरेदी करून तिला दिले आणि यापुढे बाणांची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासन दिले.

मुलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दहा वर्षांची बचत खर्च केल्यानंतर त्यांनी अखेर मिठाईचे बॉक्स बनवण्याचा स्वतःचा व्यवसायही विकला. त्या दिवसांची आठवण सांगताना ते म्हणतात, “कुमकुमच्या आईचे स्वप्न होते की तिने तिरंदाज व्हावे. माझ्या आयुष्यातील दोन सर्वांत महत्त्वाच्या महिलांना मी निराश कसे करू शकतो?”

पुणे जिल्ह्यातील पिंपरी येथील 18 वर्षीय पृथिका प्रदीप हिचा तिरंदाजीचा प्रवास पाचवीत असताना शाळेत झालेल्या एका उपक्रमातून सुरू झाला. या खेळाविषयीची आवड वाढल्यानंतर तिने एका वर्षाने व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. हळूहळू ही आवड तिच्या आयुष्यातील ध्येय आणि समर्पणात बदलली.

आज ती प्रशिक्षक कुणाल तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळे गुरव येथील तिरंदाजी केंद्रात सराव करते. आई-वडील प्रिया आणि प्रदीप यांच्या पाठिंब्यामुळे तिने शिक्षण आणि कठोर प्रशिक्षण यांच्यात योग्य समतोल राखला. तिच्या मेहनतीचे फळ तिला 2016 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकून मिळाले.

साताऱ्यातील 25 वर्षीय साहिल जाधव याच्यासाठी तिरंदाजी हा आता जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. प्रशिक्षक प्रवीण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेणाऱ्या साहिलने शिस्त, शारीरिक तंदुरुस्ती आणि सातत्याने स्वतःच्या कामगिरीत सुधारणा करण्यावर आपल्या कारकिर्दीचा पाया उभारला आहे.

    आर्थिक अडचणी असूनही त्याच्या आई-वडिलांनी प्रशिक्षण, खेळाचे साहित्य आणि स्पर्धांमध्ये सहभागी होण्याच्या संधी त्याला उपलब्ध करून देण्याची काळजी घेतली. भारतीय संघाची जर्सी परिधान करण्याचा अर्थ केवळ स्वतःची स्वप्ने पूर्ण करणे नसून, आई-वडिलांची स्वप्नेही पुढे नेणे असा आहे, असे साहिल सांगतो.

    त्याच्या मते, तिरंदाजीमध्ये संयम आणि मानसिक खंबीरपणा अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण अगदी छोटीशी चूकही सामन्याचा निकाल बदलू शकते.

    या तिन्ही खेळाडूंच्या यशोगाथा क्रीडा क्षेत्रातील यशाचे विविध पैलू अधोरेखित करतात. यामध्ये कुटुंबीयांचे त्याग, लहान वयातच प्रतिभेला योग्य दिशा देण्याचे महत्त्व आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यासाठी आवश्यक असलेली शिस्त यांचा समावेश आहे.

    या कथा हेही स्पष्ट करतात की, खेळाडूंचे यश केवळ त्यांच्या मेहनतीवर आणि दृढनिश्चयावर अवलंबून नसते. त्यांना संस्थात्मक स्तरावर सातत्याने पाठबळ मिळणेही तितकेच आवश्यक असते.

    भारतीय तिरंदाजीला एनटीपीसीचे पाठबळ

    एनटीपीसी 2018 पासून आपल्या कॉर्पोरेट सामाजिक दायित्वाच्या (CSR) उपक्रमांतर्गत भारतीय तिरंदाजीला सहकार्य करत आहे. यासाठी राष्ट्रीय क्रीडा विकास निधी (NSDF), भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) आणि भारतीय तिरंदाजी संघटना (AAI) यांच्या माध्यमातून 152.88 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याची बांधिलकी व्यक्त करण्यात आली आहे.

    या सहकार्यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यावर प्रतिभावान खेळाडूंची ओळख पटवणे, प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे, क्रीडा साहित्य पुरवणे, शिष्यवृत्ती देणे, तिरंदाजी अकादमींना मदत करणे आणि विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे यांचा समावेश आहे.

    ‘धनुर्विद्या प्रकल्प’ : नवोदित तिरंदाजांसाठी संधी

    ‘धनुर्विद्या प्रकल्प’ हा या प्रयत्नांचा एक महत्त्वाचा भाग आहे. तळागाळातून तिरंदाजीच्या क्षेत्रात येणाऱ्या खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण आणि योग्य संधी उपलब्ध करून देऊन त्यांना उच्चस्तरीय स्पर्धांपर्यंत पोहोचवणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

    या उपक्रमांतर्गत महिला खेळाडू आणि पॅरा-तिरंदाजांनाही संधी उपलब्ध करून दिल्या जातात.

    कुमकुम, पृथिका आणि साहिल यांच्यासारख्या खेळाडूंच्या कहाण्या दाखवून देतात की, योग्य मार्गदर्शन, कुटुंबीयांचा पाठिंबा, संस्थात्मक सहकार्य आणि अथक मेहनत यांच्या बळावर महाराष्ट्रातील तरुण खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल करू शकतात.