नवी दिल्ली. आयपीएलमध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या वैभव सूर्यवंशीने इंग्लंडमध्ये आणखी एक आक्रमक खेळी करून सर्वांना तोंडात बोटे घालण्यास भाग पाडले आहे. होव येथे झालेल्या भारत आणि इंग्लंड अंडर-19 संघांदरम्यानच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने इंगिल्श गोलंदाजी फोडून काढली.
भारताची सीरियर टीम तसेच भारताचा 19 वर्षांखालील संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. काउंटी ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात वैभवने धमाकेदार खेळी केली. त्याचे अर्धशतक थोडक्यात हुकले असले तरी त्याच्या खेळीने विजयाचा पाया रचला गेला.
252.63 च्या स्ट्राईक रेटने कुटल्या धावा -
या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत सर्वबाद 174 धावा केल्या. कर्णधार आयुष महात्रेसोबत डावाची सुरुवात करताना वैभवने आपली स्फोटक फलंदाजी कायम राखत सुरुवातीपासूनच आक्रमक फटके मारले. वैभवने 252.63 च्या स्ट्राईक रेटने 19 चेंडूत तीन चौकार आणि पाच षटकारांसह 48 धावा केल्या. तो आपले अर्धशतक पूर्ण करू शकला नाही, परंतु त्याने निश्चितच संघाच्या विजयाचा पाया रचला. त्याने आयुषसोबत 71 धावा जोडल्या. वैभव 50 धावा पूर्ण करेल असे वाटत असतानाच राल्फी अल्बर्टने त्याचा डाव खराब केला. त्याची फलंदाजी पाहून इंग्लंडचे तरुण गोलंदाज थक्क झाले.
आयपीएलमध्येही दाखवली होती ताकद-
वैभवने आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळला. त्याच्या शानदार फलंदाजीने त्याने दाखवलेला प्रभाव दाखवून देतो की भारतात प्रतिभेची कमतरता नाही. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध खेळताना, वैभवने 35 चेंडूत शतक ठोकले होते, जे लीगमधील भारतीय फलंदाजाचे सर्वात जलद शतक आहे. आयपीएलमधील सर्वात जलद शतकांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.