नवी दिल्ली. हरमनप्रीत कौरच्या राजीनाम्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघात मोठा बदल झाला आहे. सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना (Smriti Mandhana) कडे भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिने तिन्ही फॉरमॅटमधील कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर काही तासांतच बीसीसीआयने स्मृती मानधनाच्या नावाची घोषणा केली.

तसेच एकदिवसीय मालिकेत दीप्ती शर्मा तर टी-20 (T20I) मालिकेत शेफाली वर्मा (Shafali Verma) उपकर्णधार म्हणून स्मृती मानधनाला साथ देतील.

महिला निवड समितीने झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. स्मृती मानधनाच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरेल. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेची सुरुवात 16 ऑक्टोबरपासून रायपूरमध्ये होईल, तर दोन सामन्यांची एकदिवसीय मालिका 23 ऑक्टोबरपासून वडोदरा येथे खेळली जाईल.

मानधनासाठी नियमित कर्णधार म्हणून ही पहिली मालिका असेल. सांगायचे तर मंगळवारी हरमनप्रीत कौरने टीम इंडियाच्या सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर बीसीसीआयने मानधनाला तिन्ही फॉरमॅटची नवीन कर्णधार बनवले आहे. ती झिम्बाब्वेविरुद्ध होणाऱ्या मालिकेतून कर्णधार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करेल.

शफाली वर्मा आणि दीप्ती शर्माला मिळाली जबाबदारी

भारताची सलामीवीर फलंदाज शफाली वर्मालाही बीसीसीआयने मोठी जबाबदारी दिली आहे. शफालीने टीम इंडियासाठी टी-20 फॉरमॅटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. अशा स्थितीत आता तिला टी-20 संघाची नवीन उपकर्णधार बनवण्यात आले आहे. दुसरीकडे एकदिवसीय फॉरमॅटसाठी अष्टपैलू दीप्ती शर्माकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

    झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ

    स्मृती मानधना (कर्णधार), शफाली वर्मा, निक्की प्रसाद, हरमनप्रीत कौर, अनुष्का शर्मा, रिचा घोष, जी कमलिनी, दीप्ती शर्मा, प्रेमा रावत, श्री चरणी, नंदिनी शर्मा, क्रांती गौड, अरुंधती रेड्डी, जिंतीमणी कलिता, मिन्नू मणी.

    झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ

    स्मृती मानधना (कर्णधार), शफाली वर्मा, प्रतिका रावल, हरमनप्रीत कौर, हरलीन देओल, तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, रिचा घोष, यास्तिका भाटिया, वैष्णवी शर्मा, नंदिनी शर्मा, श्री चरणी, क्रांती गौड, सायली सातघरे, रेणुका ठाकूर.