नवी दिल्ली.  Shreyas Iyer Hospitalized: टीम इंडियाचा फलंदाज श्रेयस अय्यरला सिडनी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान झेल घेताना बरगडीला दुखापत झाल्यानंतर अय्यरला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.

सामन्यादरम्यान, अय्यरने अ‍ॅलेक्स कॅरीचा एक शानदार झेल घेण्यासाठी मागे धाव घेत झेल टिपला, परंतु त्याच्या डाव्या बरगडीला दुखापत झाली. ड्रेसिंग रूममध्ये परतल्यानंतर, त्याला तीव्र वेदना आणि अस्वस्थता जाणवू लागली आणि त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. पीटीआयच्या वृत्तानुसार, अय्यरला अंतर्गत रक्तस्त्राव झाला असून त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.

एका सूत्राने सांगितले की श्रेयस गेल्या दोन दिवसांपासून आयसीयूमध्ये आहे. चाचण्यांमध्ये अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याचे दिसून आले, म्हणून त्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल करावे लागले. इन्रफेक्शन रोखण्यासाठी त्याला दोन ते सात दिवस डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवले जाईल.