नवी दिल्ली. indian women cricket team : अमनजोत कौर आणि दीप्ती शर्मा यांच्या अर्धशतकांच्या आणि गोलंदाजीच्या दमदार कामगिरीच्या जोरावर, भारतीय महिला क्रिकेट संघाने मंगळवारी श्रीलंकेचा 59 धावांनी पराभव करत आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकात भारताने विजयी सलामी दिली. प्रथम फलंदाजी करताना भारताने 47 षटकांत आठ विकेट गमावून 269 धावा केल्या. पावसामुळे सामना 47 षटकांपर्यंत कमी करण्यात आला आणि त्यानंतर श्रीलंकेला डकवर्थ-लुईस नियमानुसार 271 धावांचे लक्ष्य मिळाले, जे ते साध्य करू शकले नाहीत.

श्रीलंकेचा संघ 45.4 षटकांत 211 धावांवर आटोपला. श्रीलंकेकडून कर्णधार चामारी अटापट्टूने सर्वाधिक 43 धावा केल्या. भारताकडून दीप्तीने उत्कृष्ट कामगिरी करत तीन विकेट घेतल्या. भारतीय डावात 10 षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसाने हजेरी लावली.  ज्यामुळे सामना 48 षटकांपर्यंत कमी झाला. डावाच्या मध्यात पुन्हा पाऊस पडला, ज्यामुळे एक षटक कमी करण्यात आले.

श्रीलंकेची संथ सुरुवात -

श्रीलंकेची सुरुवात संथ झाली. अटापट्टू आणि हसिनी परेरा यांनी पहिल्या विकेटसाठी 30 धावा जोडल्या, पण त्या धावा सात षटकांत आल्या. सातव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर क्रांती गौडाने हसिनीला बाद केले. त्यानंतर कर्णधार आणि हर्षिता समरविक्रम यांनी आणखी एक भागीदारी रचली, जी धोकादायक होत चालली होती. त्यानंतर श्रीचरणी हिने कर्णधाराला बाद करून श्रीलंकेला अडचणीत आणले. 15 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ती बाद झाली त्यावेळी लंकेची धावसंख्या 82 होती. मात्र त्यानंतर ठराविक अंतराने विकेट जात राहिल्या. 

भारतीय डाव

त्याआधी, भारताने फक्त 121 धावांत पाच विकेट गमावल्या होत्या, कर्णधार हरमनप्रीत कौर, हरलीन देओल आणि जेमिमा रॉड्रिग्ज हे सर्व एकाच षटकात बाद झाले. श्रीलंकेच्या इनोका रणवीराने (4/46) 26 व्या षटकात तीन विकेट घेतल्या आणि भारताला बॅकफूटवर आणले. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

    ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकतीच सलग दोन शतके झळकावणारी स्मृती मानधना (08) चौथ्या षटकात बाद झाली. त्यानंतर प्रतीका रावल (37) आणि हरलीन (48) यांनी संघाची धुरा सांभाळली. 10 व्या षटकात पावसामुळे सामना 48 षटकांपर्यंत कमी करण्यात आला. त्यानंतर रणवीराने प्रतीकाला बाद केले आणि श्रीलंकेला दुसरे यश मिळवून दिले. संघाला क्रीजवर आलेल्या कर्णधार हरमनप्रीतकडून मोठ्या आशा होत्या आणि तीही चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होती, परंतु 26 व्या षटकात रणवीराने सामन्याचे पारडे पालटवले व भारतीय संघाला 200 धावांचा आकडा गाठणेही कठीण वाटू लागले.

    तथापि, अमनजोत आणि दीप्ती यांनी संघाची आणखी पडझड होऊ दिली नाही. अमनजोतने 56 चेंडूत पाच चौकार आणि एक षटकार मारला, तर दीप्तीने 53 चेंडूत तीन चौकारांसह तेवढ्याच धावा केल्या. 250 पेक्षा जास्त धावा करण्यात यशस्वी झालेल्या भारतासाठी ही भागीदारी महत्त्वाची ठरली.