नवी दिल्ली, पीटीआय: BCCI Injury Substitute Rule: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या खेळाच्या अटींमध्ये सुधारणा करत, आगामी हंगामासाठी बहु-दिवसीय देशांतर्गत स्पर्धांमध्ये 'गंभीर दुखापतींसाठी पर्यायी खेळाडू' घेण्याची तरतूद लागू केली आहे. हे पाऊल भारत आणि इंग्लंड यांच्यात नुकत्याच 2-2 अशा बरोबरीत सुटलेल्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी कसोटी मालिकेदरम्यान ऋषभ पंत आणि ख्रिस वोक्स यांच्या दुखापतींनंतर उचलण्यात आले आहे.
राज्य संघटनांना सूचित केलेल्या नवीन नियमात म्हटले आहे की, जर एखाद्या खेळाडूला संबंधित सामन्यादरम्यान गंभीर दुखापत झाली, तर खालील परिस्थितीत पर्यायी खेळाडूला परवानगी दिली जाऊ शकते. यात पुढे म्हटले आहे की, ही गंभीर दुखापत खेळादरम्यान आणि खेळाच्या क्षेत्रातच लागलेली असावी.
त्यानुसार, दुखापत कोणत्याही बाह्य आघातामुळे झालेली असावी आणि त्यामुळे फ्रॅक्चर, खोल जखम किंवा 'डिस्लोकेशन' (हाड सरकणे) इत्यादी झालेले असावे. या दुखापतीमुळे खेळाडू उर्वरित सामन्यासाठी अनुपलब्ध झाला पाहिजे.
यात म्हटले आहे की, पर्यायी खेळाडूची ओळख पटवावी लागेल, जो गंभीर दुखापत झालेल्या खेळाडूसाठी 'समान बदली' (like-for-like replacement) असेल. हा नियम वरिष्ठ आणि कनिष्ठ देशांतर्गत स्पर्धांच्या बहु-दिवसीय सामन्यांमध्ये लागू होईल आणि 28 ऑगस्टपासून दुलीप ट्रॉफी आणि 19 वर्षांखालील सी.के. नायडू ट्रॉफीमध्ये याची सुरुवात होईल.