जेएनएन, मुंबई. वसई/ विरार महापालिका हद्दीत सुमारे 80,000 मतदारांची नावे दुबार नोंदवली गेल्याचा गंभीर आरोप बहुजन विकास आघाडी (BVA) यांनी केला आहे. पक्षाचे संघटक सचिव अजीव पाटील यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे औपचारिक तक्रार दाखल करत या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे.
दुबार नावांमुळे पारदर्शकतेवर शंका — BVA
अजीव पाटील यांनी म्हटले की, “मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर एकाच व्यक्तीचे नाव दोनदा, कधी तीनदा दिसत आहे. काही ठिकाणी एकाच कुटुंबातील सदस्यांचीही पुनरावृत्ती झालेली आहे. हे एक गंभीर तांत्रिक आणि कारभारातील दुर्लक्ष आहे.”
बहुजन विकास आघाडीच्या तक्रारीनुसार, काही विभागांत घर क्रमांक, जन्मतारीख, ओळखपत्र क्रमांक एकच असूनही मतदारांची नावे दुबार नोंदली गेली आहेत. यामुळे मतदान प्रक्रियेची पारदर्शकता धोक्यात येत आहे. काही गटांना अनुचित राजकीय फायदा मिळण्याची शक्यता वाढते.
BVA ने निवडणूक आयोगाला विनंती केली आहे की, “दुबार नावांमुळे निवडणुकीचा निकाल प्रभावित होऊ शकतो, त्यामुळे तत्काळ पडताळणी करून मतदार यादी शुद्ध करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल!
बहुजन विकास आघाडीनं केलेल्या तपासणीत अनेक प्रभागांमध्ये मतदारांची संख्या वास्तवापेक्षा अचानक वाढलेली आढळली. काही मतदारांचे नाव दोन वेगवेगळ्या बूथवर दिसत असल्याचे समोर आले. या सर्व पुराव्यांसह औपचारिक लेखी तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आली आहे. माहितीनुसार, प्रशासन आता प्राथमिक दस्तऐवज तपासत असून निवडणूक आयोगानेही अहवाल मागवला आहे.
पूर्ण मतदारयादी पुनर्पडताळणी BVA ची मागणी!
बविआचे नेते पाटील यांनी सांगितले की, “ज्या प्रभागांत दुबार नावं मोठ्या प्रमाणात आढळली आहेत, त्या सर्व प्रभागांची मतदार यादी घरोघरी जाऊन पडताळणी करावी अशी मागणी केली आहे.
