जेएनएन, मुंबई. Pandharpur Wari Yatra 2024: पंढरपूरला होणाऱ्या आषाढी वारीचे विशेष महत्व आहे. पंढरपूरला भरणाऱ्या या वारकऱ्यांच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी सहभागी होत असतात. पंढरपूरला येणाऱ्या प्रमुख वाऱ्यांमध्ये ज्ञानदेवांची पालखी व तुकोबांची पालखी या मुख्य असतात. या पालख्यांसह हजारोंच्या संख्येत वारकरी आषाढी वारी निमित्त पंढरपुरात दाखल होत असतात.
अनेक वर्षांपासून पंढरपूरला पालखी निघण्याची परंपरा सुरु असून, एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज या दोघांच्या पालख्या निघत असत. पुढे विठलाचे निस्सीम भक्त संत निवृत्तीनाथ,संत सोपानदेव, संत मुक्ताबाई, संत जनार्दन स्वामी, संत एकनाथ, संत सावता माळी, संत रामदास स्वामी आणि संत गजानन महाराज यांची पालखी शेगाव येथून दर्शनासाठी पंढरीस येतात. या पालख्यांसोबत येणारे समस्त वारकरी ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषात, अभंग म्हणत, पारंपरिक खेळ खेळत पंढरपुरात दाखल होतात.
ज्ञानदेवांची पालखी
ज्ञानदेवांची पालखीची हजोरो वर्षापासून सुरु असलेली वारीची ही परंपरा हैबतबाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी-समारंभांसह, मोठ्या उत्साहात पंढरपूरला नेण्याची प्रथा चालू केली. असे सांगितले जाते की, पूर्वी श्री ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्यात हत्ती, घोडे इत्यादी औंधचे श्रीमंत राजेसाहेब यांच्याकडून येत असत. आळंदी ते पंढरपूर पालखीचा संपूर्ण खर्च श्रीमंत राजेसाहेब उचलत असत. पुढे मात्र पालखीचा खर्च सरकरने द्द्यायला सुरवात केली. पुढे 1852 मध्ये सरकारने पंच कमिटीची स्थापना केली व कमिटीच्या नियंत्रणाखाली ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची व्यवस्था केली.
ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्यासाठी गावातील एका कुटुंबाने बैलजोडी देण्याचा मान आहे. हजारो वर्षांपासून चालत आलेल्या या परंपरेत फक्त आळंदी गावातील 6 कुटुंबालाच हा मान दिला जात आहे. माऊलींचा पालखी रथ आळंदीहून पंढरपूरला जाताना 18 दिवसाचा प्रवास असून, रथापुढे दिंडी क्र 1 व 7 हा वै गुरुवर्य ब्रह्मचैतन्य तात्यासाहेब आबासाहेब महाराज वासकर यांना मान देण्यात आला आहे. माउलींच्या रथ फक्त 2 खिल्लार बैलच ओढत संपूर्ण प्रवास पूर्ण करतात. ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा आळंदीहून पंढरपूरला जाताना 18 दिवसात जातो, पण परतीच्या वारीला निम्म्या दिवसात पालखी रथ पंढरपूरहून आळंदीला परत येतो.
तुकोबांची पालखी
संत तुकाराम महाराजांच्या पूर्वजांपासून त्यांच्या कुटुंबात विठलाची भक्ती सुरु आहे. तुकाराम महाराजांचे पूर्वज विश्वंभर बाबा हे ज्ञानदेव-नामदेवांच्या समकालीन होते. तुकाराम महाराजांच्या पूर्वजांपासून त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी सुरु होती. तुकाराम महाराज देखील प्रत्येक शुद्ध एकादशीस चौदाशे टाळकरी घेऊन पंढरपुराला जात असत. तुकाराम महाराजांच्या निधनानंतर वारीची परंपरा कायम राहिली तुकाराम महाराजांचे कनिष्ठ पुत्र नारायण महाराज यांनी वारीचे रूपांतर पालखी सोहळ्यात केले व वारीची परंपरा चालू ठेवली.
तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी पुणे जिल्ह्यातील कोणतेही कुटुंब पालखी रथाच्या बैलजोडीचा मानासाठी अर्ज भरू शकतात. त्यांनतर आलेल्या अर्जांची तपासणी करून, संस्था आणि डॉक्टरांची टीम योग्य अशा खिल्लार बैलांची निवड करतात. तुकोबांचा पालखी रथ ओढण्याचा मान दरवर्षी 2 वेगवगेळ्या कुटुंबाला हा मान दिला जातो.पालखी रथ पहिल्या दिवशी एका कुटुंबाची बैल ओढतात आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या कुटुंबाची बैल रथ ओढतात. पालखीच्या विसाव्याच्या ठिकाणी डॉक्टरांची टीम या खिल्लार बैलांची वेळोवेळी तपासणी करत असते.
रिंगण सोहळा
या पालखी सोहळ्या दरम्यान विविध मैदानी खेळ खेळले जातात. जय हरि विठ्ठल, ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमत असतो. पालखी सोहळ्या दरम्यान खेळला जाणारा महत्वाचा खेळ म्हणजे रिंगण सोहळा होय हा रिंगण सोहळा संपूर्ण वारीचे वैशिष्ट्य मानले जाते. ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालखीतील रिंगण हे कडूस फाटा,वेळापूर आणि वाखरी या ठिकाणी पार पडत आहेत. या रिंगण सोहळ्यादरम्यान मोकळ्या मैदानात वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे राहतात. तेथील मोकळ्या जागेतून ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा धावत असतो. या घोड्याला आदराने "माऊलीचा अश्व" असे म्हणतात. या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज आरूढ होतात अशी वारकरी संप्रदायात धारणा आहे. त्यामुळेच या रिंगण सोहळ्याला देखील संपूर्ण पालखी सोहळ्या दरम्यान विशेष महत्व आहे.