जेएनएन, नवी दिल्ली: Navratri 2026: शारदीय नवरात्रोत्सव सुरु आहे. आज चौथी माळ आहे. आज विनायक चतुर्थी देखील आहे. अर्थात आई आणि लेकाची एकत्रित सेवा करण्याचा दुहेरी संयोग. यंदा 14 ऑक्टोबर 2026 रोजी ही मंगलमय तिथी जुळून आली आहे. शारदीय नवरात्री उत्सव सर्वत्र मोठ्या भक्तिभावात साजरा केला जात आहे.
आज चौथी माळ - आदिशक्तीच्या कुष्मांडा स्वरूपाची पूजा
वैदिक पंचांगानुसार, आज, बुधवार 14 ऑक्टोबर रोजी नवरात्रीच्या चौथ्या दिवशी आदिशक्तीच्या कुष्मांडा स्वरूपाची पूजा केली जाते. नवरात्रीच्या या पवित्र दिवशी भाविकांकडून देवीची विधिवत पूजा, मंत्रजप आणि आरती केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, देवी कुष्मांडा या सृष्टीची निर्मिती करणाऱ्या आणि संपूर्ण विश्वाला ऊर्जा प्रदान करणाऱ्या देवी मानल्या जातात. जाणून घेऊया आजचा शुभ रंग, नैवेद्य, पूजेचा शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व...
दुर्गा देवीचे चौथे स्वरुप कूष्मांडा देवी
दुर्गा देवीचे चौथे स्वरुप असलेली कूष्मांडा देवी अष्टभुजा आहे. देवीने बाण, चक्र, गदा, अमृत कलश, कमळ, कमंडलू, सिद्धी आणि निधींची माळ आदी भुजांमध्ये धारण केले आहे. कूष्मांडा देवीचे वाहन सिंह आहे.
कूष्मांडा देवीचे पूजन
सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर दुर्गा देवीच्या कूष्मांडा स्वरुपाच्या पूजनाचा संकल्प करावा. यथाशक्ती, आपापल्या पद्धती, परंपरांनुसार देवीचे पूजन करावे. देवीचे पूजन करताना लाल रंगाची फुले, जास्वंद किंवा गुलाबाचे फूल आवर्जुन वहावे. यानंतर धूप, दीप आणि नैवेद्य दाखवावा. देवीचे पूजन करताना हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते. कूष्मांडा देवीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. यामध्ये दही, साखर फुटाणा असल्यास उत्तम, अशी मान्यता आहे.
आजचा शुभ मुहूर्त
- अभिजीत मुहूर्त: नाही
- अमृत काळ: सायंकाळी 4:38 ते सायंकाळी 6:23 पर्यंत
आजचा शुभ रंग कोणता? (Shardiya Navratri 2026)
धार्मिक मान्यतेनुसार, शारदीय नवरात्रीच्या चौथ्या दिवसाचा शुभ रंग रॉयल ब्ल्यू अर्थात गडद निळा मानला जातो. आज देवीच्या पूजेसाठी निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे ही लोकप्रिय परंपरा आहे. मात्र, वेगवेगळ्या प्रांतांतील रंगांची परंपरा बदलू शकते. निळ्या रंगाला स्थैर्य, आत्मविश्वास आणि सामर्थ्याचे प्रतीक मानले जाते.
कूष्मांडा देवीचा मंत्र
कूष्मांडा देवीचे पूजन करताना तसेच पूजनानंतर पुढील मंत्र म्हणावा. शक्य असल्यास यथाशक्ती जप करावा.
ॐ देवी कूष्माण्डायै नमः॥
या देवी सर्वभूतेषु माँ कूष्माण्डा रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
अस्वीकरण: या लेखात सांगितलेले उपाय/फायदे/सल्ले आणि विधाने केवळ सामान्य माहितीसाठी आहेत. दैनिक जागरण येथे या लेखाच्या वैशिष्ट्यात लिहिलेल्या गोष्टींचे समर्थन करत नाही. या लेखात अंतर्भूत असलेली माहिती विविध माध्यमे/ज्योतिषी/पंचांग/प्रवचने/मान्यता/धर्मग्रंथ/दंतकथा यांतून एकत्रित केली गेली आहे. वाचकांना विनंती आहे की त्यांनी या लेखाला अंतिम सत्य किंवा दावा मानू नये आणि आपल्या विवेकबुद्धीचा वापर करावा. दैनिक जागरण अंधश्रद्धेच्या विरोधात आहे.
