जेएनएन, नागपूर.Kojagiri pornima 2026: विदर्भासह कोकण आणि महाराष्ट्राच्या विविध भागांत भुलाबाई, हादगा आणि भोंडला या पारंपरिक लोकपरंपरांना विशेष महत्त्व आहे. पिढ्यान्पिढ्या मौखिक परंपरेतून जतन झालेल्या या लोकगीतांमधून महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे दर्शन घडते.
विशेषतः भाद्रपद महिन्यात सुरू होणाऱ्या भुलाबाईच्या उत्सवात मुलींचा सहभाग, सामूहिक गाणी, फेर धरून खेळणे, प्रसाद वाटप आणि पारंपरिक रीतिरिवाज यांना महत्त्व असते. या गीतांमधून भक्तिभाव, कौटुंबिक नाती, माहेरची ओढ, निसर्ग, बालपण आणि ग्रामीण लोकजीवन यांचे सुंदर चित्र उमटते.
- ऐलमा पैलमा
ऐलमा पैलमा गणेश देवा,
माझा खेळ मांडू दे, करीन तुझी सेवा.
माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी,
पारवळ घुमती गिरिजा कपारी.
अंकाणा तुझी सात वर्षे,
भोंडल्याला तुझी सोळा वर्षे.
- वहाते मी हादग्यापुढे,
हादगा देव मी पूजिते.
सख्यांना बोलविते,
हादगा देव मी पूजिते.
लवंगा, सुपाऱ्या, वेलदोडे,
करून ठेविले विडे.
वहाते मी हादग्यापुढे,
हादगा देव मी पूजिते.
- आला चेंडू गेला चेंडू
आला चेंडू, गेला चेंडू,
राया चेंडू झुगारिला.
आपण चाले हत्ती-घोडे,
राम चाले पायी.
रामाचा पत्ता कुठे नाही
राम गं वेचितो कळ्या,
सीता गं गुंफिते जाळ्या.
- भाद्रपदाचा महिना
भाद्रपदाचा महिना आला,
आम्हा मुलींना आनंद झाला.
पार्वती बोले शंकराला,
“चला हो माझ्या माहेरा, माहेरा!”
गेल्यावर पाट बसायला
ताट जेवायला,
विनंती करू यशोदेला.
टिपऱ्या खेळू, गाणी गाऊ,
प्रसाद घेऊन घरी जाऊ,
घरी जाऊ!
- भुलाबाईचा पहिला दिवस
साखरेच्या गोणीबाई
लोटविल्या अंगणी.
आज आमच्या भुलाबाईला
पहिला दिवस, पहिला दिवस!
- अळकित जाऊ की खीळकित जाऊ,
खीळकित ठेवली माती.
भुलोजीला लेक झाला
नाव ठेवा गणपती!
आडकीत जाऊ, खिडकीत जाऊ
खिडकीत होती सुई
भुलाबाईला लेक झाली,
नाव ठेवा जुई!
