जागरण प्रतिनिधी, नवी दिल्ली: यंदा 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी दोन दिवसांच्यामध्ये आल्यामुळे भाविकांच्या मनात उपवास कधी करावा याबाबत संभ्रम आहे. या शुभ दिनाचे व्रत (उपवास) कसे करावे, त्याचे महत्त्व काय आहे आणि पारणे (उपवास सोडणे) कधी करावे, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
मराठी दिनदर्शिकेनुसार 1 नोव्हेंबर रोजी प्रबोधिनी (स्मार्त) एकादशी आहे आणि 2 नोव्हेंबर रोजी भागवत एकादशी आहे. त्यामुळे व्रताचरण कधी करावे, याबाबत सर्वांच्या मनात गोंधळ निर्माण झाला आहे.
स्मार्त म्हणजे जे लोक वेंदांवर, श्रुती स्मृती, पुराण यांना प्रमाण मानतात, ज्यांना वैदिक धर्माचं ज्ञान आहे, ते स्मार्त एकादशी पाळतात. थोडक्यात ऋषी, मुनी तसेच कर्मकांड करणारे योगी स्मार्त एकादशी करतात. तर वैष्णव म्हणजे जे विष्णू भक्त आहेत, संसारी आहेत, जे सूर्योदय पाहणारी तिथी ग्राह्य धरतात ते भागवत एकादशीचे व्रत करतात. म्हणून विष्णू भक्तांनी स्मार्त एकादशीला विष्णू पूजा करावी मात्र एकादशी व्रताचे पालन भागवत एकादशीला करावे असे सांगितले जाते. त्यामुळे सर्व जण 2 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीचा उपवास पकडत आहेत.
कार्तिकी एकादशीचे व्रत
त्यानुसार 2 नोव्हेंबर रोजी कार्तिकी (Kartiki Ekadashi 2025) एकादशीचे व्रत करावे असे शास्त्र सांगते. याच तारखेपासून तुलसी विवाह यासारख्या शुभ कार्यास सुरुवात होत आहे.
कार्तिकी एकादशी व्रत करण्याची पद्धत : एकादशीचे व्रत करण्याचे नियम दशमी तिथीपासून (एक दिवस आधी) सुरू होतात आणि द्वादशी तिथीला (दुसऱ्या दिवशी) पारण केल्यानंतर पूर्ण होतात.
कार्तिकी एकादशी तिथीचे नियम:
ब्रह्म मुहूर्तावर (सकाळच्या वेळी) उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे. हातात पाणी आणि अक्षता घेऊन 'मी हे व्रत पूर्ण श्रद्धेने करत आहे, ते निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे' असा संकल्प करावा.
