जेएनएन, मुंबई. Ncp Sharad Pawar Party : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा केली आहे. प्रदेशाध्यक्ष पदावर निवड झाल्यानंतर शशिकांत शिंदे यांनी पक्ष संघटनेला अधिक भक्कम करण्याचा निर्धार व्यक्त केला. पक्ष विस्तारासाठी राज्यभर सक्रियपणे काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मात्र त्यांना पक्षाला बळकटी देण्यासाठी तसेच एकजूट ठेवण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.
गोरगरीब जनतेच्या हितासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही देत लवकरच राज्यभर दौरा करणार असून आर. आर. पाटलांप्रमाणे संधीचे सोने करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या पक्षांनी गोर-गरीब जनतेसाठी अहोरात्र कष्ट केले, त्या नेत्यांच्या पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून राज्यातील अनेक प्रश्नांना आणि अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करेन. आगामी काळात पक्ष संघटना वाढवत असताना, ही पक्ष संघटना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवेल, महाराष्ट्रात पक्षाची सत्ता आणण्यासाठी दिवसरात्र कष्ट करेल,असे ही शशिकांत शिंदे म्हणाले.
पक्षफुटीचे मोठे आव्हान -
शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांना भविष्यात पुन्हा पक्ष फुटणार नाही यांची काळजी घेण्याची सर्व जबाबदारी दिली आहे. पक्ष संघटना वाढवत असतांना पक्ष साबूत राहील पाहिजे त्यासाठी विशेष रणनीती आखण्याचा कानमंत्र ही शरद पवार यांनी शिंदे यांना दिल्याचे समजते.
जयंत पाटील भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा -
प्रदेशाध्यक्षपदावरून नुकतेच पायउतार झालेले जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचेही बोलले जात आहे. मी कुठेही जाणार नाही, असे म्हणत असले तरी जयंत पाटील यांनी भाजपसोबत जाण्याबाबत सांगली जिल्हा व मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी मते घेत सर्वेक्षण केल्याचे सांगितले जात आहे. जर जयंत पाटील भाजपच्या गळाला लागले तर शरद पवार गटासाठी मोठा धक्का असेल. त्यांच्यासोबत अनेक आमदार, पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची मोठी फळी पक्षातून जाण्याची भीती आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक -
येत्या दोन-तीन महिन्यात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित होऊ शकतात. विधानसभा निवडणुकीतील पराभवाने आलेली मरगळ झटकून कार्यकर्त्यांना कामाला लागणे, त्यांच्यात उत्साह भरणे आदि कामे शिंदे यांना करावी लागणार आहे. अनेक नेत्यांच्या पक्ष सोडण्यामुळे खिळखिळी झालेली पक्षयंत्रणा पुन्हा नव्या जोमात उभी करण्याचे मोठे आव्हान शिंदे यांच्यासमोर असणार आहे.