Sanjay Raut on Honey Trap Case : हनी ट्रॅप प्रकरणाची गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा रंगली. हा मुद्दा विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही गाजला होता. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केल्यानंतर यावर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हनी ट्रॅपच्या घटना फेटाळून लावताना राज्यात कोठे ना हनी आहे ना ट्रॅप असे म्हटले होते. मात्र शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (21 जुलै) एक फोटो ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिलं आहे.
हनी ट्रॅपमुळेच शिवसेनेचे चार तरुण खासदार पळाले -
संजय राऊत यांनी गिरीश महाजन यांच्यासोबत आणखी एका व्यक्तीचा फोटो ट्विट करत म्हटले आहे की, मुख्यमंत्री देवेंद्रजी विधानसभेतही दिशाभूल करतात, महाराष्ट्रात हनी ट्रॅप नाही असे त्यांनी सांगितले, या एका फोटोची सीबीआय मार्फत चौकशी होऊ द्या! दुध का दूध पानी का पानी होईल! 4 मंत्री, अनेक अधिकारी अडकले आहेत! शिवसेनेतून फुटलेले 4 तरुण खासदार (तेव्हा )याच ट्रॅपमुळे पळाले. असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. त्यामुळे ट्रॅपचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
मुख्य मंत्री देवेंद्रजी विधानसभेतही दिशाभूल करतात,
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 21, 2025
महाराष्ट्रात हनी ट्रॅप नाही असे त्यांनी सांगितले:
या एका फोटोची सीबीआय मार्फत चौकशी होऊद्या!
दुध का दूध पानी का पानी होईल!
४ मंत्री
अनेक अधिकारी अडकले आहेत!
शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार (तेंव्हा )याच ट्रॅप मुळे पळाले .
pic.twitter.com/DduL723OOw
संजय राऊत यांनी म्हटले की, हनी ट्रॅपची सुरुवात महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी दिल्लीतून झाली. या हनी ट्रॅपमुळे १६ ते १७ आमदार आणि चार खासदार भाजपाने आपल्याकडे वळवले. त्यांना सीडी दाखवली जात होती. ईडी, सीबीआय हा प्रकार वेगळा आहे. देवेंद्र फडणवीस किती खोटे बोलत आहेत, हे त्यांना माहिती आहे. हनी ट्रॅपचा सूत्रधार त्यांच्यासोबत त्यांच्या मंत्रिमंडळात आहे. विजय वडेट्टीवार यांनी थोडी माहिती दिली आहे. यासंदर्भात पूर्ण माहिती मी देणार आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
ना हनी आहे ना कोणता ट्रॅप आहे - मुख्यमंत्री
विधीमंडळ अधिवेशनात नाना पटोले यांनी राज्यातील आजी-माजी मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकले असल्याची माहिती दिली होती. याद्वारे राज्य सरकारशी संबंधित काही गोपनीय माहिती दिली गेली असण्याची शक्यता असल्याने सरकारने यावर निवेदन करावे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली होती. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, कुठला हनी ट्रॅप आणला? नाना पटोलेंचा हनी बॉम्ब आमच्यापर्यंत आलाच नाही. तुमच्याकडे असला तर तो आमच्याकडे दिला पाहिजे. ना हनी आहे, ना ट्रॅप. या संदर्भात कोणतेही पुरावे नाहीत, अशी कुठलीही घटना घडलेली नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधीमंडळात स्पष्ट केले होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले की, सध्या असं वातावरण झालंय की आजी-माजी मंत्री एकमेकांकडे संशयाने बघत आहेत. कोण फसलंय असा प्रश्न सर्वांना पडू लागलाय. कोणत्याही आजी-मंत्र्यांची हनी ट्रॅपची तक्रार नाही अथवा पुरावेही नाही. अशा बाबतची एक तक्रार नाशिकमधून आली होती.