एजन्सी, नवी दिल्ली: तामिळनाडूमध्ये शिव षण्मुगम आणि एस. पी. वेलुमणी यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटाचे सदस्य असलेल्या एआयएडीएमकेच्या तीन आमदारांनी सोमवारी विधानसभा अध्यक्ष जे. सी. डी. प्रभाकर यांची भेट घेऊन आपले राजीनामे सादर केले. ते सत्ताधारी टीव्हीके पक्षात सामील होणार आहेत.
अध्यक्षांना भेटल्यानंतर लगेचच, तीन आमदार मार्गथम कुमारवेल, पी. सत्यबामा आणि एस. जयकुमार यांनी टीव्हीकेचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री आदव अर्जुन यांची भेट घेऊन, आपण सत्ताधारी पक्षात सामील होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले.
AIADMK च्या तीन आमदारांनी दिला राजीनामा
अध्यक्षांनी एआयएडीएमकेच्या तिकिटावर निवडून आलेल्या तीन आमदारांचे - मदुरंथकमचे कुमारवेल, धारापुरमच्या सत्यबामा आणि पेरुंबूरचे जयकुमा यांचे राजीनामे स्वीकारले.
दरम्यान, षण्मुगम-वेलुमणी गटातील पाच आमदारांनी पक्षप्रमुख एडप्पाडी के. पलानीस्वामी यांच्याकडे परतण्याचा निर्णय घेतला. या घडामोडीवर पत्रकारांनी षण्मुगम यांची प्रतिक्रिया विचारली असता, ते फक्त म्हणाले, "आपण नंतर बोलू."
एआयएडीएमकेच्या तीन आमदारांनी येथील सचिवालयात अध्यक्षांची भेट घेऊन आपले राजीनामे सादर केले. धरपुरम (तिरुप्पूर) आणि पेरुंदुराई (इरोड) हे एआयएडीएमकेचा पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या 'कोंगू' प्रदेशाचा भाग आहेत, तर मदुरंतकम चेन्नईजवळ वसलेले आहे.
AIADMK सोडून टीव्हीकेमध्ये सामील होणार का?
त्यानंतर लगेचच त्यांनी आदव अर्जुन यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. ते मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील तमिळगा वेत्तिरी कळघममध्ये सरकारमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन करून, या तिन्ही आमदारांनी 13 मे रोजी टीव्हीके सरकारच्या समर्थनार्थ मतदान केले होते.
